Ladki Bahin in Bihar : बिहारमध्ये महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा, 'नरेंद्र आणि नितीश हे तुमचे दोन भाऊ', पीएम मोदी काय म्हणाले?
PM Modi Bihar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये राजदची सत्ता असताना खूप भ्रष्टाचार होता असं म्हटलं. महिलांना अराजकता आणि भ्रष्टाचाराचा सामना करावा लागलेला असं मोदी म्हणाले.

पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी राष्ट्रीय जनता दलावर टीका केली. राजदची सत्ता असताना बिहारमध्ये भ्रष्टाचार खूप होता, असं म्हटलं. यावेळी मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेनुसार बिहारच्या 75 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10 हजार रुपयांची रक्कम पाठवण्यात आली. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार देखील उपस्थित होते.
नरेंद्र मोदी म्हणाले, नवरात्रीच्या या पवित्र दिवसांमध्ये मला बिहारच्या महिला शक्तीसह त्यांच्या आनंदात सहभागी होण्याची संधी मिळाली. नवरात्रीच्या पवित्र पर्वात तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आमच्या सर्वांसाठी एक मोठी शक्ती आहे. मी तुमचे मनापासून आभार मानतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
Mukhyamantri Mahila Rojgar Yojana 75 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की आजपासून मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरु केली आहे. या योजनेशी आतापर्यंत 75 लाख महिला जोडल्या गेल्या आहेत. आता एकत्रितपणे 75 लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी 10 हजार रुपये पाठवण्यात आले आहेत. जेव्हा ही प्रक्रिया सुरु होती तेव्हा मी विचार केला की नितीश कुमार यांच्या सरकारनं बिहारमध्ये बहिणी आणि मुलींसाठी किती मोठं आणि महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. जेव्हा कोणतीही बहीण किंवा मुलगी रोजगार किंवा स्वंयरोजगार करते तेव्हा त्यांच्या स्वप्नांना नव बळ मिळतं, समाजात त्यांचा सन्मान वाढतो.
मोदी यांची राजदवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी राजदवर टीका केली. राजदच्या काळात कोणीही घरी सुरक्षित नसायचं. सर्वाधिक त्रास महिलांनी सहन केला आहे. महिलांनी राजदच्या नेत्यांचे अत्याचार पाहिले आहेत. मात्र, नितीशकुमार यांच्या सरकारच्या काळात महिला निर्भीडपणे फिरत आहेत. आम्ही महिलांना वाचवण्यासाठी उज्ज्वला योजना घेऊन आलोय, असं मोदींनी म्हटलं.
जेव्हा कोणतही सरकार महिलांसाठी केंद्रात धोरण ठरवतं तेव्हा त्याचा फायदा समाजाच्या दुसऱ्या घटकाला देखील होतो. उज्ज्वला योजनेमुळं किती बदल घडून आला आहे. आज पूर्ण जग पाहत आहे. स्वस्थ महिला, सशक्त परिवार अभियान सुरु केलंय. या अभियानाद्वारे सव्वा चार लाखांहून अधिक आरोग्य शिबिरांचं गावोगावी आयोजन केलं जात आगे. कमी रक्त असणं, बीपी, मधुमेह आणि कॅन्सर सारख्या गंभीर उपचारांची तपासणी केली जातेय, असं मोदी म्हणाले.
दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे. या विधानसभा निवडणुकीत एनडीए विरुद्ध महागठबंधन असा सामना असेल.
























