Kidney Transplant: औरंगाबादमध्ये एचआयव्हीग्रस्त व्यक्तीचे यशस्वी किडनी प्रत्यारोपण; एचआयवी संक्रमित पत्नीने वाचवले पतीचे प्राण
Aurangabad News: या रुग्णाला किडनीच्या आजाराने गेल्या तीन वर्षापासून ग्रासले होते आणि ते सीएपीडी होम डायलिसिसवर होते.
Aurangabad News: एचआयव्ही संक्रमित पत्नीने एचआयव्हीग्रस्त (HIV Positive) पतीला किडनी दान करुन एक नवा इतिहास रचला. डॉ. सचिन सोनी, सल्लागार इंटरव्हेंशन नेफ्रोलॉजिस्ट, मेडिकव्हर हॉस्पिटल, संभाजीनगर यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांच्या टीमने हे यशस्वी प्रत्यारोपण केले. दोघेही रूग्ण एचआयव्हीबाधीत आणि विरोधी रक्तगट असल्याने अशाप्रकारे किडनी प्रत्यारोपण होणारी ही जगभरातील पहिलीच नोंद आहे. या रुग्णाला किडनीच्या आजाराने गेल्या तीन वर्षापासून ग्रासले होते आणि ते सीएपीडी होम डायलिसिसवर होते. यशस्वी प्रत्यारोपणांनतर आता दोन्ही रूग्ण बरे असून, नुकताच डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि आता ते त्यांचे दैनंदिन कामकाज सहजतेने करू शकतात.
बीड जिल्ह्यातील 48 वर्षीय रहिवासी नितीन देसाई (नाव बदलले आहे) हे व्यवसायाने कापूस व्यापारी आहेत. 2008 मध्ये ते एचआयव्ही बाधीत असल्याचे आढळून आले आणि त्यांच्यावर अँटिरेट्रोव्हायरल थेरपी सुरू करण्यात आली. 2019 मध्ये उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंड निकामी झाल्याचे आढळून आले. त्यांनी 2020 मध्ये प्रथम डॉ. सोनी यांच्याशी संपर्क साधला. ते गेल्या तीन वर्षांपासून होम डायलिसिस (CAPD-एंबुलेटरी पेरिटोनियल डायलिसिस) वर उपचार घेत होते. पंरतु, त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत गेल्याने त्यांना अशक्तपणा येऊ लागला. किडनी प्रत्यारोपणाच्या पर्यायावर रुग्णाच्या कुटुंबीयांशी चर्चा करण्यात आली.
शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
दरम्यान रुग्णाची 45 वर्षीय पत्नी हीसुध्दा एचआयव्ही बाधीत होती. तिच्या पतीचा जीव वाचवण्यासाठी किडनीदाता म्हणून पुढे आली. दोघेही नियमित अँटिरेट्रोव्हायरल थेरपी घेत आहेत. तथापि, तिचा रक्तगट (A+ve) म्हणजे रुग्णांच्या रक्तगटापेक्षा वेगळा (B+ve) होता. एबीओ विसंगत (रक्त गट जुळणारे) किडनी प्रत्यारोपणाबाबत डॉ. सोनी यांनी नातेवाईकांचे समुपदेशन केले. एचआयव्ही पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये प्रत्यारोपण करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून सप्टेंबर 2022 मध्ये संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली. दाता आणि रूग्ण अशा दोघांच्याही पात्रतेची पुष्टी केल्यानंतर, आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या. औरंगाबाद येथील जिल्हा प्राधिकरण समितीकडून मूत्रपिंड प्रत्यारोपणाची परवानगी घेण्यात आली आणि 18 जानेवारी 2023 रोजी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
जगातील पहिली शस्त्रक्रिया...
याबाबत माहिती देताना डॉ. सोनी म्हणाले की, एचआयव्ही रूग्णांची प्रतिकारशक्ती आधीच कमी असते आणि प्रत्यारोपणादरम्यान वापरण्यात येणारी औषधे अशा रूग्णांची प्रतिकारशक्ती आणखी कमकुवत करू शकतात. या रूग्णांसाठी सुधारित औषधांचा डोस आणि उपचारांच्या मदतीने प्रत्यारोपण केले. ही शस्त्रक्रिया सुमारे चार तास चालली. किडनीविकारतज्ञ, शल्यचिकित्सक, सहाय्यक, नर्सिंग स्टाफ आणि मदतनीस यांचा समावेश असलेल्या संपूर्ण टीमने आवश्यक खबरदारीचे पालन केले. यशस्वी प्रत्यारोपणानंतर दात्याला 24 जानेवारी रोजी डिस्चार्ज देण्यात आला आणि प्राप्तकर्त्याला 31 जानेवारी रोजी घरी सोडण्यात आले. हे अवयव प्रत्यारोपण अतिशय आव्हानात्मक होते. रूग्ण आणि दाता दोघेही एचआयव्ही बाधीत आणि रक्तगटातील विसंगती यामुळे हे आव्हान मोठे होते आणि अशाप्रकारे उपचार केलेल्या रूग्णांची जगभरात कुठेही नोंद नसल्याने या प्रकरणाचा अहवाल लवकरच आम्ही आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित करणार असल्याचे डॉ. सोनी यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या:
औरंगाबादमध्ये तब्बल सात वर्षानंतर पुन्हा वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव होणार; तारीखही ठरली
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )