(Source: ECI/ABP News/ABP Majha)
औरंगाबादमध्ये तब्बल सात वर्षानंतर पुन्हा वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव होणार; तारीखही ठरली
Ellora-Ajanta International Festival 2023: 25, 26 आणि 27 फेब्रुवारी 2023 रोजी सोनेरी महाल येथे जागतिक दर्जाच्या सुप्रसिध्द कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
Ellora-Ajanta International Festival 2023: औरंगाबाद (Aurangabad) हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्यानं ती ओळख अधिक दृढ करण्यासाठी 1985 पासून वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित केला जातो. मात्र मागच्या काही वर्षात दुष्काळ, अतिवृष्टी, कोरोना या कारणाने या महोत्सव होऊ शकला नाही. मात्र यंदा हा महोत्सव होत आहे. 25,26 आणि 27 फेब्रुवारी 2023 रोजी सोनेरी महाल येथे जागतिक दर्जाच्या सुप्रसिध्द कलाकारांमार्फत शास्त्रीय आणि उपशास्रीय, गायन ,शास्त्रीय नृत्य सादर केले जाणार आहे. सदर महोत्सवामध्ये उस्ताद राशीद खान, उस्ताद सुजात खान, महेश काळे, रवी चारी, शिवमनी, विजय घाटे, संगीता मुजूमदार आणि शंकर महादेवन कला सादर करणार आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने 1985 पासुन वेरुळ येथील कैलास लेणी समोरील जागेमध्ये जगविख्यात वेरूळ महोत्सव आयोजित करण्याची सुरूवात केली होती. सदर महोत्सवाचे रूपांतर 2002 पासुन वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात करण्यात आले. सदर महोत्सव जिल्हा प्रशासन, संयोजन समीती व पर्यटन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यामाने करण्यात येतो. प्रतिवर्षी प्रमाणे सन 2016 साली वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु मागच्या काही काळात विविध कारणामुळे हा महोत्सव होऊ शकला नाही. मात्र यंदा 25,26 आणि 27 फेब्रुवारी 2023 रोजी सोनेरी महाल येथे तब्बल सात वर्षानंतर पुन्हा वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव होणार आहे. याबाबत औरंगाबाद जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.
मान्यवरांच्या हस्ते रविवारी होणार उद्घाटन !
पूर्वरंग हा वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाची नांदी असलेला पूर्वरंग कार्यक्रमाने महोत्सवाला सुरुवात होईल. याचे उद्घाटन रविवारी बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. यावेळी रावसाहेब दानवे (केंद्रीय राज्यमंत्री- रेल्वे, कोळसा व खाण, भारत सरकार) आणि डॉ. भागवत कराड (केंद्रीय राज्यमंत्री वित्त, भारत सरकार) यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, संदीपान भुमरे (पालकमंत्री तथा रोहयो व फलोत्पादन मंत्री महाराष्ट्र) यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. तर अब्दुल सत्तार (कृषी मंत्री महाराष्ट्र) , अतुल सावे (सहकार व पणन, तथा सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र) हे कार्यक्रमाचे सह अध्यक्ष असतील.
महोत्सवानिमित्त पूरक कार्यक्रमांची रेलचेल!
वेरूळ औरंगाबाद महोत्सवानिमित्त यंदा शहरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये गायन वादन तसेच व्याख्यान- सादरीकरण यांचा समावेश करण्यात आला आहे. "पूर्वरंग" कार्यक्रमानंतर आठवड्यात हे कार्यक्रम होतील. यामध्ये 15 फेब्रुवारी रोजी क्रांती चौकात लोककलांचे सादरीकरण होईल. सुमित धुमाळ (गोंधळ), शेखर भाकरे (भारुड) आणि अजिंक्य लिंगायत (पोवाडा) हे कलाकार सहभागी होतील. 18 फेब्रुवारी 2023 रोजी पैठण गेट येथे राहुल खरे (भावगीत भक्तीगीत) तसेच पं विश्वनाथ दाशरथे (भक्तीगीत- उपशास्त्रीय) यांच्या गायनाचा आनंद रसिकांना घेता येईल. 21 फेब्रुवारी 2023 रोजी दिल्ली गेट येथे झामा कव्वाल ग्रुपचे सादरीकरण होणार आहे. हे सर्व कार्यक्रम रात्री 8 ते 09.30 दरम्यान होतील.
इतर महत्वाच्या बातम्या:
Photo: अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन वेरुळ लेणीत- पाहा खास फोटो