(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: कंपन्या येण्यापूर्वीच 'ऑरिक सिटी' चोरट्यांच्या निशाण्यावर; पोलिसांची कारवाई
Aurangabad : सुरक्षारक्षक चोरांसोबत मिळालेले असल्याचेही समोर आलं आहे.
Aurangabad Auric City: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या दृष्टीने औरंगाबादमध्ये उभारण्यात आलेल्या ऑरिक सिटीमध्ये कंपन्या येण्यापूर्वीच चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. ऑरिक सिटीच्या बिडकीन परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे ज्या सुरक्षारक्षकांवर ऑरिक सिटीच्या सुरक्षेची जवाबदारी आहे, तेच सुरक्षारक्षक चोरांसोबत मिळालेले असल्याचेही समोर आलं आहे. दरम्यान औरंगाबाद ग्रामीणच्या बिडकीन पोलिसांनी अशाच तीन चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,एल अँड टी कंपनीचे अधिकारी अनवर फसीयोद्दीन खान यांनी पोलीस स्टेशन बिडकीन येथे तक्रार दिली होती की, डीएमआयसी म्हणजेच ऑरिक सिटीच्या बिडकीन प्रकल्पातील डी-10 रोडवरील भगवती माता मंदीर परिसरातील मधील रस्त्याचे कडेला असलेल्या पावरडकमधुन कृष्णा धोंडीराम गोरडे (रा.वरूड ता.पैठण जि.औरंगाबाद), नामदेव ज्ञानदेव बोंद्रे (रा.वरुडी ता.पैठण), सुनिल संतोष गिरी (रा.भुसावळ) यांनी विद्युत वाहीनीची 3 कोर 240 स्केअर एमएमची केबल तोडून बाहेर काढून मोटार सायकलवर घेवून जातांना मिळून आले होते.
यावेळी या तिघांना सुरक्षा सुपरवायझर करनसिंग काहीटे यांना अडवून विचारपूस केली. मात्र त्यांनी त्यांचेकडील लोखंडी सळईने काहीटे यांना मारहाण करून जबरदस्तीने 70 हजार रुपये किंमतीची विद्युत वाहीनीची केबल घेऊन फरार झाले. त्यानंतर याप्रकरणी बिडकीन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकाची नियुक्ती सुद्धा करण्यात आली होती. याच दरम्यान पोलिसांनी तिन्ही आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे पोलिसांच्या तपासात या आरोपींनी यापूर्वी देखील चोरी केलेल्या अनेक घटनांचा खुलासा झाला आहे.
आरोपींनी या गुन्ह्यांची कबुली दिली
- विद्युत वाहीनीची 3 कोर 240 स्केअर एमएम ची केबल ज्याची किंमत 70 हजार रुपये आहे.
- एचएफ डीलक्स कंपनीची मोटार सायकल ज्याची किंमत 40 हजार रुपये आहे.
- एक टेक्नो कंपनी जुना वापरता मोबाईल ज्याची किंमत 10 हजार आहे.
- एक रिअल मी कंपनीचा जुना वापरता डीस्प्ले फुटलेला मोबाईल ज्याची किंमत 6 हजार आहे.
- तिन्ही आरोपींकडून एकुण 1 लाख 27 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
चोरीसाठी मोटरसायकलही चोरीचीच...
बिडकीन पोलिसांनी डीएमआयसीत चोरी करणाऱ्या तिन्ही चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहे. या चोरट्यांकडे एक मोटरसायकल सुद्धा सापडली आहे. विशेष म्हणजे ही मोटरसायकल सुद्धा चोरीचीच आहे. वडदबाजार येथून या चोरट्याने मोटरसायकल चोरून आणली होती. डीएमआयसीत चोरीसाठी तिन्ही आरोपी हीच चोरीची मोटरसायकल वापरत होते. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली बिडकीन पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संतोष मानेसह त्यांच्या पथकाने केली आहे.