अन् भर मुलाखतीत खैरेंनी पायातील बूट हातात घेतला, नेमकं काय घडलं पहा...
Aurangabad: शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना लोकं आता जोड्याने मारतील असे खैरे म्हणाले.
Aurangabad News: शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले चंद्रकांत खैरे यांचा पुन्हा एकदा आक्रमकपणा पाहायला मिळाला आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुळाखतीवेळी शिंदे गटावर संतापेल्या खैरेंनी चक्क पायातील बूट काढले. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर संताप व्यक्त करत त्यांना लोकं आता जोड्याने मारतील असे खैरे म्हणाले.
यावेळी बोलतांना खैरे म्हणाले की, औरंगाबाद येथे पालकमंत्री असतांना रामदास कदम यांनी सर्वांना त्रास दिला होता. ज्या उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांना संभाळेले,मंत्री केले त्यांच्याबद्दल कदम असे विधान करतात. त्यामुळे एवढं सर्व काही देऊन हा माणूस उद्धव ठाकरेंबद्दल अशाप्रकारे बोलत असेल तर त्यांचा मेंदू सडला आहे की काय असं खैरे म्हणाले. तर खैरे यांनी पायातील बूट हातात घेऊन, यांना लोकं प्रत्यक्षात जोड्याने मारल्याशिवाय राहणार नसल्याचं खैरे म्हणाले. तर कदम यांनी माफी मागितली पाहिजे असेही खैरे म्हणाले.
राज्यभरात आंदोलन...
शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आता विकोपाला गेला आहे. त्यातच दोन्ही बाजूचे नेते एकेमकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यातच काही नेते पातळीसोडून आरोप करत असल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे. अशातच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध राज्यभरात शिवसेनेकडून आंदोलन केले जात आहे.