औरंगाबाद महानगरपालिकेचा कारवाईचा धडाका सुरूच; आज पुन्हा 30 अनधिकृत बांधकामे पाडली
Aurangabad : विशेष म्हणजे मागील 10 वर्षापासून काही नागरिकांच्या विरोधामुळे आणि व्यवस्थित मार्किंग या रस्त्याचे काम होत नव्हते असा आरोप नागरिकांनी केला आहे.
Aurangabad News: गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद महानगरपालिकेकडून (Aurangabad Municipal Corporation) अतिक्रमणधारकांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान आज पुन्हा मनपाने अशीच काही कारवाई केली आहे. औरंगाबाद महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आज सकाळी टाऊन हॉल लाल मस्जिद ते मकाई गेट या डीपी रस्त्यावर मोहीम सुरू करण्यात आली. ज्यात 24 मीटर रुंद रस्त्यावरील तब्बल 30 बांधकामे निष्कासित करण्यात आली. विशेष म्हणजे मागील 10 वर्षापासून काही नागरिकांच्या विरोधामुळे आणि व्यवस्थित मार्किंग नसल्याने या रस्त्याचे काम होत नव्हते असा आरोप नागरिकांनी केला आहे.
टाऊन हॉल लाल मस्जिद ते मकाई गेट या डीपी रस्त्यावर झालेल्या अनधिकृत बांधकामाबाबत प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नगररचना आणि अतिक्रमण विभागाची बैठक घेऊन मार्गदर्शन केले आणि पुन्हा या ठिकाणी व्यवस्थित मार्किंग करून सर्व बांधकाम विभागणी बाबत आदेशित केले होते. दरम्यान वीस दिवसांपूर्वी या ठिकाणी पूर्ण 24 मीटरची मार्किंग देण्यात आली होती. तर अनेक बांधकाम धारकांनी सहकार्य करून स्वतःहून बांधकामे काढली. परंतु काही अतिक्रमण धारक अतिक्रमण काढत नव्हते. त्यामुळे त्यांना नियमानुसार नोटीस देण्यात आली होती.
या रस्त्यावर टिन पत्र्याचे मेडिकल स्टोअर, काही ठिकाणी कच्चे पक्के बांधकाम करून चिकन मटण असे अनधिकृत दहा बाय पंधरा या आकाराचे 4 दुकाने निष्काषित करण्यात आले. सदर रस्त्याचे काम सध्या हाती घेण्यात आले असून टाऊन हॉल लाल मस्जिद पासून रस्त्याचे काम सुरू आहे. जी 20 अंतर्गत शहरात मान्यवर व्यक्ती येणार असल्याने या रस्त्याचे कामाला सुद्धा गती मिळाली आहे. याचप्रमाणे उद्याही अशी मोहीम सुरू राहणार असून उरलेले अतिक्रमण बांधकामे काढण्यात येणार असल्याची मनपाने दिली आहे.
यांनी केली कारवाई...
आजची कारवाई कारवाई मा. प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार माननीय अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रविंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये,अतिक्रमण पोलीस निरीक्षक फईम हाश्मी, इमारत निरीक्षक सय्यद जमशेद ,बेगमपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बोडके, इमारत निरीक्षक रवींद्र देसाई व सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
इतर महत्वाचे बातम्या: