'मनरेगा'च्या निधीत घोटाळ्याचा आरोप; शासनासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस
Aurangabad News: मनरेगामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 10 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
Aurangabad News: औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) फुलंब्री तालुक्यात 'मनरेगा'च्या (MGNREGA) निधीमध्ये अनियमिततेचा आरोप करण्यात आला असून, याबाबत करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे (Aurangabad Bench) न्या. रवींद्र घुगे आणि न्या. संजय देशमुख यांनी शासनासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान या जनहित याचिकेवर 10 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फुलंब्री तालुक्यातील निमखेडा येथील पांडुरंग जीवरग, साहेबराव फुके आणि भगवान फुके यांनी अॅड. देवदत्त पालोदकर यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेत 'मनरेगा'च्या निधीमध्ये अनियमिततेचा आरोप केला आहे. त्यांनी याचिकेत म्हटल्यानुसार, 2013 ते 2020 दरम्यान अनेक मृत व्यक्तींना निमखेडा येथील मनरेगाच्या कामावरील कामगार दाखवून निधीचा अपहार केल्याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे. निधीचा वापर कशा प्रकारे करावा याबाबतच्या (जीओ टॅगिंग) 17 डिसेंबर 2012 आणि 10 डिसेंबर 2020 च्या शासन निर्णयांची अंमलबजावणी केला नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
तसेच जिथे काम मंजूर केले तेथे काम केले नसल्याचे समोर आले आहे. गावात फक्त 174 गट असताना अस्तित्वात नसलेल्या त्यापेक्षाही जादा गटांमध्ये काम झाल्याचे दाखवले आहे. केटिवेअरमधून गाळ काढण्याच्या कामातही निधीचा अपहार झाला आहे. वरील सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनास द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. अमेय सबनीस आणि अॅड. शुभम खोचे यांनी काम पाहिले.
खंडपीठाने यांना दिली नोटीस
दरम्यान या जनहित याचिकेच्या अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठाने राज्याचे महसूल विभागाचे प्रधान सचिव, औरंगाबादचे विभागीय आयुक्त, मनरेगाचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा जिल्हाधिकारी, फुलंब्री पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, निमखेडाचे तलाठी, सरपंच आणि मनरेगा सहायक यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे. या जनहित याचिकेवर 10 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
प्रशासनात खळबळ उडाली...
सन 2013 ते 2020 या दरम्यान फुलंब्री तालुक्यात 'मनरेगा'च्या निधीमध्ये अनियमिततेचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान हे प्रकरण थेट औरंगाबाद खंडपीठात पोहचले असून, न्यायालयाने संबंधित विभागासह अधिकाऱ्यांना नोटीस पाठवल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे मृत व्यक्तींना कामगार दाखवून पैसे लाटण्यात आल्याचा गंभीर आरोप पुराव्यासह करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित विभागात खळबळ उडाली असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे पुढील सुनावणीत नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Aurangabad Crime News: बायको गेली माहेरी, त्याने व्हिडीओ कॉल केला अन् जीवन संपवलं