TET Scam: टीईटी घोटाळ्यात खुद्द अब्दुल सत्तारांचा सहभाग तर नाही ना?; दानवेंकडून चौकशीची मागणी
Aurangabad: मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या काही तासांपूर्वी सत्तार यांच्यावरील आरोपाने त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.
Aurangabad News: टीईटी घोटाळ्यात (TET Scam) माजी मंत्री अब्दुल सत्तारांच्या मुलांची नावे समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. यावरूनच त्यांच्यावर विरोधकांनी निशाणाही साधला आहे. तर टीईटी घोटाळ्यात खुद्द अब्दुल सत्तारांचा सहभाग तर नाही ना? याची सुद्धा चौकशी केली पाहिजे अशी मागणी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे. मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या काही तासांपूर्वी सत्तार यांच्यावरील आरोपाने त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.
काय म्हणाले अंबादास दानवे...
या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देतांना अंबादास दानवे म्हणाले की, टीईटी घोटाळ्यात तब्बल आठ हजार नावं समोर आले आहेत. या सर्व प्रकरणाची सरकारकडून चौकशी सुरु असतांना, याच यादीत आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलांचे नावं सुद्धा समोर आली आहेत. त्यामुळे निश्चितपणे या सर्व प्रकरणाची आणखी सखोल चौकशी केली गेली पाहिजे. तसेच टीईटी घोटाळ्यात खुद्द अब्दुल सत्तारांचा सहभाग तर नाही ना? याची सुद्धा चौकशी करण्याची गरज आहे. तसेच बोगस प्रमाणपत्र स्वीकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांची सुद्धा चौकशी केली पाहिजे. मंत्री राहिलेले सत्तार यांचे नाव यात समोर आल्याने, आता नवीन मंत्रीमंडळात त्यांच्याकडे शिक्षण खाते दिल्यावर आणखी चांगली चौकशी होऊ शकेल असा टोलाही दानवे यांनी लगावला.
सुळावर लटकवा...
टीईटी घोटाळ्यात सत्तार यांचे नाव समोर आले आहेत. परंतु प्रत्यक्षात अब्दुल सत्तार यांचा दोष नसेल तर त्यांनी या प्रकरणाची सीआयडी चौकशी लावावी. तसेच माझ मत आहे की, सत्तार यांनी हे केले नसेल तर ज्यांनी कुणी हा घोटाळा केला असेल त्यांना पकडून सुळावर लटकवले पाहिजे. त्यांच्यामुळे आज हजारो मुलांचे नुकसान झाले आहेत. त्यामुळे सरकारने गंभीरपणे यांची चौकशी केली पाहिजे अशी माझी मागणी असल्याचं खैरे म्हणाले आहे.
सत्तारांची मंत्रिपदाची संधी हुकणार...
उद्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यापूर्वी सत्तार यांच्या मुलींचे टीईटी घोटाळ्यात नाव समोर आल्याने, पहिल्या यादीतून त्यांचे नाव वगळले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटातील महत्वाच्या नेत्यांपैकी सत्तार महत्वाचे नेते समजले जातात. तसेच त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात होती. मात्र अचानक टीईटी घोटाळ्याची बातमी समोर आल्याने त्यांना सद्यातरी मंत्रीमंडळातून डावलल्या जाण्याची शक्यता आहे.