(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धक्कादायक! गुप्तधनासाठी तरुणाला विवस्त्र करून मारहाण, पायावर ज्वलनशील पदार्थही टाकले
Aurangabad Crime News: औरंगाबादच्या ग्रामीणच्या वडोदबाजार पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबादच्या (Aurangabad) सिल्लोड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, गुप्तधनासाठी तरुणाला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यानंतर या मुलाच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला पेटवून देण्याचा देखील आरोपींकडून प्रयत्न करण्यात आला. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरु असून, अजूनही तो बेशुद्ध अवस्थेत आहे. याप्रकरणी औरंगाबादच्या ग्रामीणच्या वडोदबाजार पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवान खरात असे जखमी तरुणाचे नाव असून, तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कचरू गोपाल खरात, विठ्ठल एकनाथ फरकडे, आणि भाऊसाहेब विट्ठल फरकडे असे तिन्ही आरोपींचे नावं आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी तरुणाच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे. ज्यात त्यांचा मुलगा भगवान खरात हा नेहमीप्रमाणे गावात काही कामानिमित्ताने गेला होता. दरम्यान यावेळी गावातील कचरू गोपाल खरात, विठ्ठल एकनाथ फरकडे, आणि भाऊसाहेब विट्ठल फरकडे यांनी भगवान बोलावून घेतले. तसेच गुप्तधन काढण्यासाठी जादूटोणा करण्याच्या उद्देशाने त्याला सुरवातीला दारू पाजली. त्यानंतर त्याला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. ज्यात भगवान गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पायावर टाकलं ज्वलनशील पदार्थ...
जादूटोणा करण्याच्या उद्देशाने सुरवातीला भगवान याला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. त्यानंतर तीनही आरोपींनी भगवान याच्या पायावर ज्वलनशील पदार्थ टाकल्याने त्याचा पाय जळला आहे. दरम्यान त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असतांना, डॉक्टरांनी त्याचा पाय काढावा लागणार असल्याचे सांगितले. त्यानंतर शस्त्रक्रिया करून त्याचा पाय काढण्यात आला आहे. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली पोलिसांकडून तपास सुरु आहे.
तरुण अजूनही बेशुद्ध...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी भगवान याच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरु असून, तो अजूनही बेशुद्ध अवस्थेत आहे. त्यामुळे नेमकं घटनास्थळी काय घडले याबाबत स्पष्टता होऊ शकली नसल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. सद्या भगवानची आईने दिलेल्या तक्रारीनंतर वडोदबाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर भगवानला शुद्ध आल्यावर त्याचा जबाब घेऊन पुढील योग्य ती कारवाई केली जाईल असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
बायको सोडून गेल्याने दारूच्या नशेत मुंबईवर बॉम्ब हल्ल्याची दिली धमकी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या