Aurangabad: नामांतरावरून काँग्रेसमधील राजीनामा नाट्याबाबत पटोलेंनी बोलावली बैठक
Aurangabad News: राजीनामे देणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बाजू प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जाणून घेणार आहेत.
Aurangabad News: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वी घेतलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यांनतर काँग्रेसच्या अनेक नाराज पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याचे समोर आले आहे. पक्षाला लागलेली गळती पाहता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामे देणाऱ्या नाराज पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक बोलावली आहे. मुंबईतील टिळक भवनात संध्याकाळी 4 वाजता ही बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत पटोले नारजांशी चर्चा करून त्यांची बाजू जाणून घेणार आहे.
तीनशेपेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे...
औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरे यांनी मंजुरी देतांना, काँग्रेसकडून कोणताही विरोध करण्यात आला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील काँग्रेसमधील मुस्लीम पदाधिकारी आणि कार्यर्कत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान काँग्रेसचे औरंगाबाद शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शहरातील काही माजी नगरसेवक आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसेच औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेच्या तीनशेपेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.
हिंगोलीत पडसाद..
औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराचे पडसाद हिंगोली जिल्ह्यात सुद्धा पाहायला मिळत आहे. कारण हिंगोलीच्या अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. हिंगोली जिल्ह्यातील मुस्लिम काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सामूहिक राजीनामे पाठवले आहेत. नामांतराचा निर्णय घेत असताना काँग्रेसच्या मंत्र्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने हे राजीनामे देत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. हिंगोली जिल्ह्यातील 50 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या त्या एका निर्णयाने काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप आला आहे.
राष्ट्रवादीतही नाराजीनाट्य...
मंत्रीमंडळाच्या बैठकीत नामांतराला विरोध केला नाही म्हणून, औरंगाबाद आणि परभणी येथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. त्यांनतर उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या 40 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवले आहेत. ज्यात राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक प्रदेश सचिव मसुद शेख, जिल्हा अध्यक्ष, शहराध्यक्षसह पाच नगरसेवकांचा सुद्धा समावेश आहे.