Aurangabad: नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे आलाच नाही; खैरेंच्या दाव्याची कराडांनी काढली हवा
औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा शिवसेना-भाजप आमने सामने येण्याची शक्यता आहे.
Aurangabad city Renaming: औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून, कोणत्याही क्षणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) याची घोषणा करतील असा दावा शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (chandrakant khaire) यांनी केला होता. मात्र दुसऱ्याच्या दिवशी खैरेंच्या दाव्याची भाजप नेते तथा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (bhagwat karad) यांनी हवा काढून घेतली आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराचा कुठलाही प्रस्ताव केंद्राकडे आलेला नाही, असे कराड म्हणाले आहेत.
काय म्हणाले कराड...
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलतांना कराड म्हणाले की, मराठवाड्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामकरणाचा कुठलाही प्रस्ताव केंद्र सरकारकडे आलेला नसून, काही जण केवळ हवेत बाता मारत आहेत. कोणत्याही शहराच्या नामकरणाचा प्रस्ताव आधी राज्य विधानसभेत मंजूर करून केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवावा लागतो. कारण, शहराचे नाव बदलायचे असेल, तर त्यास रेल्वे, हवाई वाहतूक, पोस्ट खाते आदी -खात्यांची ना हरकत लागते. परंतु माझ्या माहितीनुसार राज्य सरकारने अद्याप प्रस्तावच पाठवलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी काही मंडळी चुकीची माहिती देत असावी, असं कराड म्हणाले.
खैरेंचा दावा...
दोन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना खैरे म्हणाले होते की, औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराची कायदेशीर प्रक्रिया कधी पूर्ण होणार अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील आपल्या भाषणात सांगितले की, हो आम्ही म्हणतोच संभाजीनगर आणि आहेच संभाजीनगर. कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यानीच 8 मे 1988 रोजी हे नाव जाहीर केलेलं आहे. म्हणून आपण संभाजीनगर म्हणतो, पण काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला अधिकृतरीत्या कधी करणार. मात्र उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराची अधिकृत प्रक्रिया पूर्ण केली असून, ते कधीपण जाहीर करतील असं खैरे म्हणाले होते.