Aurangabad: कृषी विभागाचा दणका! शेतकऱ्यांची लुट करणाऱ्या 18 विक्रेत्यांचे परवाने निलंबित
Agriculture Department Action: शेतकऱ्यांना लुटणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे.
Aurangabad Agriculture Department: खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी केंद्र चालकांना कृषी विभागाने चांगलाच दणका दिला आहे. गेल्या महिन्याभरात औरंगाबाद विभागातील एकूण 18 कृषी साहित्य विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे कृषी विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तर पुढेही अशीच कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे चढ्या दराने विक्री करणे, बोगस खते शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न काही कृषी विक्रेत्यांकडून केला जातो. त्यामुळे खरीप हंगाम 2022-23 मध्ये खते, बियाणे विक्रीत बोगसपणा करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईसाठी जिल्हा व विभागीय स्तरावर भरारी पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. या पथकाने शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांची लुटमार करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली आहे.
'या' जिल्ह्यात कारवाई...
औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांतील पथकांनी गेल्या महिन्याभरात 7 बियाणे विक्रेते, 9 खत विक्रेत्यांसह 2 कीटकनाशके विक्रेत्यांवर कारवाई करत, त्यांचा परवाना निलंबित केला आहे. बीड जिल्ह्यात पथकाने दोन विक्रेत्यांचा परवाना रद्द केला आहे. औरंगाबाद विभागात आतापर्यंत बोगस बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून बियाणांची 259 पाकिटे जप्त केली आहेत. या बियाणांची किंमत 2 लाख 13 हजार रुपये असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
कृषी विभागाचं आवाहन...
औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातील खरीप पूर्व आढावा बैठक कृषी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. औरंगाबादेतील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प कार्यालयात ही बैठक झाली. यावेळी राज्याच्या तुलनेत मराठवाड्यात सोयाबीन आणि कापूस उत्पदान क्षमता खूप कमी आहे. त्यामुळे या पिकाची उत्पादकता वाढावी यासाठी राज्यसरकारने हजार कोटींचा निधी उपलब्ध केला असल्याची माहिती, धीरज कुमार यांनी दिली. सोबतच जोपर्यंत 75 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नयेत असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे.