Aurangabad News : आता रक्तही महागले! औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात रक्त पिशवीच्या दरात वाढ
Aurangabad News : औरंगाबादमधील घाटीत शनिवारपासून बाहेरच्या रुग्णांसाठी रक्त बॅग 1100 रुपयांना झाली आहे.
Aurangabad News: देशभरातील नागरिकांना सद्या महागाईचे (Inflation) चटके बसत असून, अनेक गोष्टींच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. अशातच सर्वसामान्य नागरिकांचा रक्तदाब वाढवणारी बातमी समोर येत असून, औरंगाबादमध्ये (Aurangabad) आता रक्तही (Blood) महागले आहे. शासनाने रक्ताचे दर वाढवल्याने नवीन दरानुसार खासगी रक्त पिढ्यामध्ये (Blood Bank) पिशवीमागे 100 रुपये तर, शासकीय घाटी रुग्णालयात 250 रुपये वाढले आहे. शनिवारपासून घाटीत (GHATI) बाहेरच्या रुग्णांसाठी 1100 रुपयांना रक्त बॅग झाली. कालपर्यंत ही बॅग 850 रुपयांना मिळत होती. त्यामुळे या महागाईचा सामना आता रुग्णांना करावा लागणार आहे.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने रक्ताचे नवीन दर जाहीर केले आहे. यापुढे धर्मादाय, खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताच्या बाटलीची किंमत 1 हजार 450 वरुन 1 हजार 550 रुपये इतकी झाली आहे. तर सरकारी रक्तपेढ्यांमध्ये (Blood Bank) 1 हजार 50 रुपयांवरुन 1100 इतकी झाली आहे. औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीत शनिवारपासून रक्ताचे नवीन दर लागू झाले.
घाटीत दाखल झालेल्या रुग्णांना मोफत रक्त
शासकीय घाटी रुग्णालयात रक्ताच्या पिशवीचे दर वाढवण्यात आले असले, तरीही घाटीत दाखल रुग्णांना रक्त मोफत दिले जाते. मात्र बाहेरच्या रुग्णांसाठी रक्तपिशवी 850 रुपयांना होती. इतर सरकारी रक्तपेढ्यांच्या तुलनेत दर कमी होते. मात्र आता शासन निर्देशानुसार शनिवारपासून रक्तपिशवीचे 1100 रुपये नवीन दर लागू झाले, असल्याची माहिती घाटीतील शासकीय रक्तपेढीचे अधिकारी डॉ. अनिल जोशी यांनी माध्यमांना दिली आहे.
जिल्ह्यात महिन्याला साधारण 7 हजार रक्त पिशव्या लागतात
औरंगाबाद जिल्ह्यात घाटी रुग्णालयात एक आणि खाजगी आठ रक्तपेढ्या आहेत. दरम्यान महिन्याला जिल्ह्यात साधारण 7 हजार रक्त पिशव्या लागतात. त्यामुळे यासाठी घाटी रुग्णालयातील रक्तपेढीसह खाजगी रक्तपेढ्यांकडून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येत असते. ज्यातून जमा झालेल्या रक्त पिशव्या गरजूंना वेळोवेळी पुरवण्यात येत असते. त्यामुळे अनेकांना जीवनदान मिळत असते. विशेष म्हणजे घाटी रुग्णालयात दाखल रुग्णांना मोफत रक्त दिले जात असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे याचा फायदा गोरगरीब रुग्णांना होताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात रक्तदान शिबीराचे आयोजन करणे अवघड असताना देखील, घाटीतील रक्तपेढीच्या पथकाने योग्य नियोजन करत रुग्णांना रक्त पुरवले होते.
इतर महत्वाच्या बातम्या: