बायको सोडून गेल्याने दारूच्या नशेत मुंबईवर बॉम्ब हल्ल्याची दिली धमकी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Aurangabad News: कुर्ला, सीएसटी, दादर येथे बॉम्ब हल्ले (Bomb Attack) करणार असल्याची धमकी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षास फोनवरून मिळाली होती.
Aurangabad News: बायको सोडून गेल्याने एकाने चक्क दारूच्या नशेत मुंबईतील (Mumbai) कुर्ला, सीएसटी, दादर येथे बॉम्ब हल्ले (Bomb Attack) करणार असून, हल्लेखोर घोडबंदर गुजरातमार्गे मुंबईत येणार आहेत, अशी धमकी दूरध्वनीवरून मुंबई पोलिस नियंत्रण कक्षास (Mumbai Police Control Room) दिल्याचा प्रकार समोर आला आहे. तर धमकी देणाऱ्या व्यक्तीला औरंगाबादच्या एमआयडीसी वाळूज पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री रांजणगाव येथे अटक केली आहे. पंजाब शिवानंद थोरवे (वय 33 वर्षे, रा. डोळेपांगरा, जि. बुलडाणा, ह. मु. रांजणगाव) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील 112 क्रमांकावर मंगळवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने मोबाईलवरून कॉल केला. तर मुंबईच्या कुर्ला, दादर, सीएसटी या ठिकाणी बॉम्ब हल्ले करणार असून हल्लेखोर घोडबंदर गुजरात मार्गे मुंबईत येणार असल्याची माहिती दिली होती. घटनेची गंभीरत लक्षात घेत पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा तपास सुरु केला. यावेळी मुंबई पोलिसांनी तांत्रिक तपास करून फोन करणाऱ्याचे मोबाईल क्रमांकाचे लोकेशन तपासले असता ते वाळूज एमआयडीसीत असल्याचे समोर आले.
धमकी दिल्यानंतर फोन बंद...
कॉल करणाऱ्याचा लोकेशन स्पष्ट होताच, मुंबई पोलिसांनी तत्काळ एमआयडीसी वाळूज पोलिसांना याबाबत माहिती कळवली. तर माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार युसुफ शेख, गणेश सागरे यांनी मोबाइल लोकेशनच्या आधारे फोन करणाऱ्याचा रांजणगाव येथे शोध सुरु केला. मात्र, मोबाइल बंद येत होता. पोलिसांनी मोबाईल वापरकर्त्याच्या शोध घेत आहोत अशी माहिती एमडीटी मशिनवर अपलोड केली होती.
अखेर बेड्या ठोकल्या...
पोलिसांना धमकी दिल्यावर पंजाब थोरवे याने आपला फोन बंद केल्याने त्याचा शोध घेण्यासाठी वाळूज एमआयडीसी पोलिसांना अडचण येत होती. दरम्यान मुंबई रेल्वे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी एमआयडीसी वाळूज पोलिसांना थोरवेचा दुसरा नंबर दिला. मात्र तो मोबाइल नंबर इतर व्यक्तीचा निघाला. पोलिसांनी त्यास विचारपूस केली असता धमकी देणाऱ्या मोबाईल वापरकर्त्याचे नाव पंजाब थोरवे असे असून तो महिन्यांपूर्वी आपल्याकडे कामाला होता अशी माहिती दिली. तसेच तो रांजणगाव येथील दत्तनगर रोडवर राहत असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला सोबत घेऊन मध्यरात्रीनंतर पंजाब थोरवे याचे घर गाठले. तसेच त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मॉल्सच्या पार्किंगमध्ये दुचाकी 'पार्क' करत असाल तर काळजी घ्या, बसू शकतो मोठा फटका