Koradi : राख बंधारा पाणी विसर्ग; प्रशासनाच्या हालचालींना वेग
पाण्याचा विसर्गामुळे नेमके नुकसान कुठे व किती झाले आणि या घटनेची नेमकी कारणे कोणती आणि उपाययोजना या संदर्भात जिल्हाधिकारी आर. विमला यांनी वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांना विचारले.
नागपूर : कोराडी औष्णिक वीज केंद्रातील खसाळा राख बंधाऱ्यातून पाण्याच्या विसर्गामुळे झालेल्या नुकसानाबाबत सुरु असलेल्या प्रशासनाच्या हालचालींना वेग आले आहे. जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रित केले असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे, सर्व्हेक्षण, नमुना तपासणी करून एकत्रित अहवाल सादर करावा, असे निर्देश आज जिल्हाधिकारी आर.विमला यांनी दिले. राज्याचे उपमुख्यमंत्री या संदर्भात माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात सदर आढावा बैठक घेण्यात आली.
पाणी विसर्ग बाधित परिसरातील नागरिकांना आवश्यक ती मदत, सहकार्य आणि पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. पाण्याचा विसर्गामुळे नेमके नुकसान कुठे व किती झाले आणि या घटनेची नेमकी कारणे कोणती आणि उपाययोजना या संदर्भात जिल्हाधिकारी आर. विमला यांनी वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांना विचारले. तसेच ही दुर्घटना प्रथमदर्शनी गंभीर स्वरूपाची असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने कोराडी वीज केंद्राला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.
नुकसानाबाबत माती परीक्षण करा
राख बंधाऱ्याच्या सुरक्षा भिंतीच्या उंची वाढविण्याचे काम करताना त्याचा पाया मजबूत आहे किंवा कसे तसेच त्याची पर्यावरणीय परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परिसरातील शेतीच्या नुकसानाबाबत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे त्यांनी विचारणा केली. तसेच शेतीच्या परिसरात पाणी शिरल्यामुळे झालेले नुकसान व माती परीक्षण करण्याबाबतही त्यांनी सांगितले. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, निवासी उप जिल्हाधिकारी विजया बनकर, कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजेश कराडे, अभय हरणे, राजकुमार तासकर, शिरीष वाठ अधीक्षक अभियंता, खापरखेडा वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे बहादूले, आनंद काटोले, पुसदकर, उप विभागीय अधिकारी कामठी मदनूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सेलोकार व अन्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.