आधी बच्चू कडू, आता भाजप नेतेही नवनीत राणांच्या विरोधात मैदानात; उमेदवारीला थेट विरोध
Navneet Rana : नवनीत राणा यांच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक पदाधिकारी यांनी विरोध केला आहे.
अमरावती : मागील काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यातील वाद चर्चेचा विषय बनला आहे. अशात आता या वादात भाजपच्या स्थानिक नेत्यांनी देखील उडी घेतली आहे. त्यामुळे नवनीत राणा विरोधात बच्चू कडू यांच्यानंतर आता भाजपही मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे भाजपच्या अमरावतीच्या स्थानिक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याकडे नवनीत राणाच्या उमेदवारीला विरोध देखील केला आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत. तर, राणा यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, राणा यांच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक पदाधिकारी यांनी विरोध केला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपने कोणत्याही परिस्थितीत नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी अमरावतीच्या भाजप नेत्यांनी थेट उपमुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळे यांच्याकडे केली आहे. यातून अमरावतीच्या भाजप नेत्यांनी एकप्रकारे नवनीत राणा यांच्या उमेदवारीविरोधात रान उठवले आहे हे स्पष्ट होत आहे.
नवनीत राणांच्या उमेदवारीला थेट विरोध
उमेदवारी प्रक्रिया सुरू होण्यास अवघा एकच दिवस शिल्लक असताना, अचानक भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या गटाने काल रात्री नागपुरात फडणवीस यांची भेट घेतली. काहीही झाले तरी भाजपने नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार करू नये अशी मागणी अमरावती येथील भाजपच्या 17 सदस्यीय गटाने फडणवीसांची भेट घेऊन केली आहे. तसेच भाजपच्या या स्थानिक नेत्यांनी नवनीत राणा विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून काय निर्णय घेतला जाणार?
मागील काही वर्षात अमरावतीत भाजप पक्षाची ताकद वाढत असून, बदललेल्या भाजपमध्ये ही पहिलीच वेळ आहे, की जिल्हा भाजपने एकजूट दाखवून वरिष्ठांपर्यंत कोणाची तरी तक्रार केली आहे. विशेष म्हणजे आपल्या पक्षात साधा सदस्य देखील नसलेल्या नेत्याची तक्रार पक्षाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे नवनीत राणा यांना अमरावतीमधून भाजपची उमेदवारी देण्यासाठी भाजपमधूनच नकारघंटा पाहायला मिळत आहे. आता भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून काय निर्णय घेतला जातो हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
आधी बच्चू कडू आणि आता भाजप नेत्यांचा विरोध...
नवनीत राणा यांना आमदार बच्चू कडू यांनी देखील थेट विरोध केला आहे. राणा यांच्याकडून प्रहारच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहे. त्यामुळे त्यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यास आमच्याकडून देखील उमेदवार रिंगणात उतरवला जाईल असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. तर, बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावून त्यांच्यासोबत चर्चा देखील केली आहे. पण, यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे याबाबत आणखी एक एकत्रित बैठक होणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :