Amravati News: 22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार आहे. या राज्यात दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करा अशी मागणी भाजप आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
नागपूर: अयोध्येत (Ayodhya) प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा येत्या 22 जानेवारीला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते (PM Modi) या भव्य मंदिराचे उद्घाटन केले जाणार आहे. रामललाच्या अभिषेक सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. या दिमाखदार सोहळ्याकडे देश-विदेशातील तमाम रामभक्तांचे लक्ष लागले आहे. अशातच संपूर्ण देशातही 22 जानेवारीला मोठा उत्सव साजरा केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर 22 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय सण जाहीर करत या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
दरवर्षी शासकीय सुट्टी जाहीर करा
अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराचं निर्माणकार्य अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या 22 जानेवारीला राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर 22 जानेवारीला राज्यात दिवाळी साजरी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्तांना दिल्या आहेत. त्यामुळे हा अलौकिक सोहळा राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बघता यावा, या करीता 22 जानेवारी 2024 रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी. अशी मागणी भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या मागणीचे पत्र प्रवीण पोटे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवले आहे. तसेच दरवर्षी ह्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करावी असे देखील भाजप आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे.
महाराष्ट्रातील 355 साधू - संतांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण
महाराष्ट्रातून एकूण 889 जणांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले असून त्यामध्ये 534 विशेष निमंत्रित आहेत. त्यामध्ये उद्योग, क्रीडा, कला तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा समावेश आहे.तर महाराष्ट्रातील 355 साधू - संतांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खास निमंत्रित करण्यात आलं आहे.
22 जानेवारीच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील कोणत्या विभागातून किती प्रतिष्ठित निमंत्रीत?
महाराष्ट्रातून एकूण निमंत्रित - 889
महाराष्ट्रातून विशेष निमंत्रित - 534
कोकण - 397
पश्चिम महाराष्ट्र - 84
मराठवाडा (देवगिरी ) - 17
विदर्भ - 36
महाराष्ट्रातून निमंत्रित साधू संत - 355
त्यामध्ये कोकण - 74
पश्चिम महाराष्ट्र -124
मराठवाडा (देवगिरी) - 80
विदर्भ - 77
अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या