Amravati News : खळबळजनक! अमरावती शहरात घातक मोठा शस्त्रसाठा जप्त; 6 जणांची टोळी गजाआड
Amravati Police : अमरावती पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत बेकायदेशीर शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. ही शस्त्रे शहरात विक्रीसाठी आणली गेली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Amravati : अमरावती पोलिसांनी (Amravati Police) शहरात मोठी कारवाई केली आहे. अमरावती शहरात अवैध घातक शस्त्रे विक्री करणार्या 6 जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने (Crime Branch) 102 खंजर चाकू, 2 चायना चाकू आणि 2 देशी कट्टे जप्त केले आहे. या कारवाईने चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे.. या कारवाईची माहिती आज पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.
आगामी काळात ख्रिसमस तसेच शहरामध्ये महाशिवपुराण कथा सारखे धार्मिक कार्यक्रम होणार आहे. त्यापुढे काही महिन्यातच लोकसभा निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे. अमरावती शहर पोलीस आयुक्तांच्या सूचनेवरून गुन्हे शाखेच्या पथकांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत होती. त्याचवेळी पथकाला घातक शस्त्रे विक्री करणार्या टोळीची माहिती मिळाली.
गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अब्दुल सोहेल अब्दुल शफी (वय 19 वर्ष, रा. गुलीस्ता नगर) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे 1 खंजर आणि 2 चायना चाकू मिळाले. त्याची सखोल चौकशी केल्यावर त्याने साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार टोळी प्रमुख अकरम खान उर्फ गुड्डु वल्द बादुल्ला खान (वय 19 वर्ष, रा. अलीम नगर), टोळी सदस्य फरदीन खान युसुफ खान (वय 21 वर्ष, रा.राहुल नगर), मुजम्मील खान जफर खान (वय 21 वर्ष, रा.गुलीस्ता नगर), शेख सुफियान मोहम्मद अशफाक (वय 19 वर्ष, रा. यास्मीन नगर), जाहेद शहा हमीद शहा (वय 20 वर्ष, रा. लालखडी) असे सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
टोळीतील सहा आरोपींकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी त्यांनी मुंबईवरून शस्त्र आणून शहरातील गुन्हेगारांना पुरवठा करत असल्याचे चौकशीत सांगितले. सलग 72 तास सखोल तपास केल्यावर आणि विविध ठिकाणी छापा मारल्यावर आतापर्यंत 102 खंजर, 2 चायना चाकू आणि 2 अग्नीशस्त्रे (देशी कट्टे) असा एकूण 1 लाख 85 हजार 500 रूपयाची शस्त्रे जप्त करण्यात आली आहे. नागपुरी गेट पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टच्या विविध कलमान्वये आणि सहकलम 135 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.