(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amravati News: मृदा आणि जलसंधारण विभागाचा पेपर फुटला; अमरावतीच्या परीक्षा केंद्रावरील धक्कादायक प्रकार
Amravati News: अमरावतीमधील मृद व जलसंधारण विभागाचा पेपर फुटल्याची घटना घडली आहे. अमरावतीच्या ड्रीमलँड परीक्षा सेंटरवरील ही धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
Amravati News अमरावती : राज्यात पेपर फुटीच्या घटना सातत्याने घडत असल्याचे चित्र आहे. असाच एक पेपर फुटीचा धक्कादायक प्रकार अमरावतीत उघडकीस आला आहे. अमरावतीच्या (Amravati News ) ड्रीमलँड परीक्षा केंद्रावर हा धक्कादायक प्रकार घडला असून यात मृदा आणि जलसंधारण विभागाचा पेपर फुटल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी एकच गोंधळ केला. यावेळी परीक्षा केंद्रांवर असलेल्या कर्मचाऱ्याकडूनच हा पेपर फोडला गेल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी (Amravati Police) त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी लावून धरत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अधिकारीच विद्यार्थ्यांना उत्तरे पुरवत असल्याचा आरोप
महाराष्ट्र राज्य शासनाच्या मृदा आणि जलसंधारण विभागाच्या वतीने विविध पदांसाठी 20 आणि 21 फेब्रुवारी या दोन दिवस परीक्षा घेण्यात आली. मात्र, आज परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी अमरावती येथील परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याच्या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली.
काही दिवसांपूर्वी नागपूर, संभाजीनगर आणि पुण्यातील परीक्षा केंद्रांवर बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून पीएच.डी. (PhD) फेलोशिपसाठी घेण्यात आलेल्या महाज्योती (Mahajyoti) पीएचडी (PhD) परीक्षेचा पेपर फुटल्याची घटना ताजी असताना, आता पुन्हा अशी घटना घडल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी जलसंधारण अधिकारीच विद्यार्थ्यांना चिट्टीद्वारे उत्तरे पुरवत असल्याचा गंभीर आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे.
विशेष बाब म्हणजे यापूर्वी देखील याच सेंटरवर तलाठीचा पेपर फुटल्याची घटना घडली होती. प्रचंड मेहनत आणि अभ्यास करून विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून हव्या त्या प्रमाणात शासकीय नौकर भरती झालेली नाही. शिवाय हल्लीच्या स्पर्धात्मक युगात नोकरी मिळवणे, हे फार मोठे आव्हान आहे. असे असतांना शासन विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने गंभीर नसून, सतत असे प्रकार होत आसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा संताप विद्यार्थ्यांनी बोलतांना व्यक्त केला आहे.
परीक्षा नवी, पण पेपर फुटीचा पॅटर्न तोच- विजय वडेट्टीवार
पेपर फुटीच्या या प्रश्नावर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडिया एक्सवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारवर निशाणा साधला आहे. त्यावेळी ते म्हणाले, WCD चा अमरावती येथील ड्रीमलँड सेंटरवर आज पुन्हा पेपर फुटला. जलसंधारण अधिकाऱ्यांनीच पेपर फोडून परिक्षार्थ्यांना उत्तरे पुरवल्याची माहिती आहे. याच सेंटर वर तलाठी चा सुद्धा पेपर फुटला होता. परीक्षा नवी पण पेपर फुटीचा पॅटर्न तोच. या सरकार ला अजून काय पुरावे हवेत? असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी सरकारला केला आहे.