Amravati News: गांजा तस्करीसाठी नामी शक्कल, चारचाकी वाहनावर लिहलं प्रेस; 21 लाख 60 हजारांचा गांजा जप्त
Amravati News : गांजा तस्करीसाठी आरोपींनी नामी शक्कल लढवल्याची घटना अमरावती (Amravati) जिल्ह्यातील बडनेरा इथं घडली.
Amravati News : गांजा तस्करीसाठी आरोपींनी नामी शक्कल लढवल्याची घटना अमरावती (Amravati) जिल्ह्यातील बडनेरा इथं घडली. संशय येऊ नये आणि कोणी पकडू नये म्हणून गांजा तस्करीसाठी चारचाकी वाहनावर प्रेस लिहलं होतं. मात्र, पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीसांनी मोठ्या शिताफीने वाहन अडवून एक क्विंटल आठ किलो गांजा जप्त केला आहे. या गांजाची किंमत 21 लाख 60 हजार रुपये होती. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं असून दोन आरोपी फरार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बडनेरा येथे एका चारचाकीने मोठ्या प्रमाणात गांजा येत असल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी पोलिसांनी मोठ्या शिताफीने वाहन अडवलं. तेव्हा वाहनात तीन जण होते. या वाहनावर प्रेस लिहलं होतं. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात एक क्विंटल 8 किलो गांजा मिळाला. हा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. हा गांजा मुंबईला जाणार होता. पोलिसांनी एकूण 28 लाखांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी रवी मारोडकर याला अटक केली आहे. दोन आरोपी फरार झाले आहेत.
भारतात गांजावर पूर्णपणे बंदी
भारतात गांजावर पूर्णपणे बंदी आहे. तरीही लोक छुप्या पद्धतीने याची लागवड करतात. काहीजण व्यापार देखील करतात. त्याचे सेवन करतात. अशाप्रकारे, आपल्या देशात हजारो वर्षांपासून गांज्याचं सेवन केलं जातं. वर्ष 1985 पर्यंत गांजावर कुठल्याही प्रकारची बंदी नव्हती, पण राजीव गांधी यांच्या सरकारने 1985 मध्ये एनडीपीएस कायदा आणला. या कायद्यानुसार गांजावर बंदी घातली गेली. गांजाबद्दल बर्याच गोष्टी बोलल्या जातात. एकीकडे गांजाचे तोटे सांगणारे लोक आहेत तर त्याचे फायदे सांगणार्यांचीही संख्या बर्यापैकी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशात गांजावरील बंदी हटविण्याची मागणी होत आहे. काही वेळेला तर शेतकऱ्यांनी गांज्याची लागवड करण्याची सरकारनं परवानगी द्यावी अशी देखील मागणी केली आहे. तर अनेकदा शेतकरी नेत्यांनी देखील शेतकऱ्यांना गांजा लागवडीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: