(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amravati Accident : परतवाडा-बैतुल महामार्गावर भीषण अपघात, सहा तरुणांचा जागीच मृत्यू
Amravati Accident : अमरावतीच्या परतवाडा-बैतुल महामार्गावर निंभोरा फाट्याजवळ रविवारी रात्री उशिरा चारचाकी आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.
Amravati Accident : अमरावतीच्या (Amravati) परतवाडा-बैतुल महामार्गावर निंभोरा फाट्याजवळ रविवारी (17 जुलै) रात्री उशिरा भीषण अपघात (Accident) झाला. चारचाकी आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात सहा जण मृत्युमुखी पडले. एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये बोदड, खरपी, बहिरम येथील असल्याचे समजते. शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीत हा अपघात झाला. मृतांमध्ये सर्व पुरुष असून त्यांचं वय 25 ते 30 वर्षे दरम्यान आहेत.
हा अपघात नेमका कसा झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही. रात्रीची वेळ होती आणि पाऊस देखील होती. त्यातच अपघातानंतर दोन्ही वाहनं पुलाच्या खाली पडली. मात्र तीन ते चार तासांनंतही या अपघाताची माहिती पोलिसांसह कोणालाच मिळालेली नव्हती. रात्री उशिरा शिरजगाव-कसबा पोलिसांची गाडी पेट्रोलिंग करत असताना त्यांना इथे अपघात झाल्याचा संशय आला. त्यांनी पुलाखाली पाहिलं असता दुचाकी आणि चारचाकी पडलेली दिसली. त्यानंतर त्यांनी मदत आणि बचाव कार्याला सुरुवात केली.
या अपघतात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला आणि सहा तरुणांना जीव गमवावा लागला. हे तरुण कुठून कुठे जात होते, याचा तपास पोलीस करत आहेत.
मृतांची नावे...
1. पांडुरंग रघुनाथ शनवारे (वय 30 वर्षे) रा. बोदड ता चांदूर बाजार
2. सतीश सुखदेव शनवारे (वय 30 वर्षे) रा. बहिरम कारंजा
3. सुरेश विठ्ठल निर्मळे (वय 25 वर्षे) रा. खरपी.
4. Innova चालक रमेश धुर्वे (वय 30 वर्षे) रा. सालेपूर
5. MH-27-S-4670 होंडा स्प्लेंडरचा चालक नाव प्रतीक दिनेशराव मांडवकर (वय 26 वर्षे)
6. अक्षय सुभाष देशकर (वय 26 वर्षे) रा. बोदड ता चांदूर बाजार