Akola: स्कार्फ बांधून मुलींच्या वसतीगृहात शिरला मुलगा, अकोला विद्यापीठातील घटना
Viral Video : अकोला विद्यापीठातील एका मुलाने स्कार्फ बांधून मुलीच्या वसतीगृहात प्रवेश केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
अकोला: अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील (Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth Akola) एका व्हिडीओमुळे (Viral Video) सध्या चांगलीच खळबळ उडाली आहे. या विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात (Girls Hostel) एक मुलगा वेशांतर करुन शिरल्याची घटना घडली. हा मुलगा मुलींप्रमाणेच तोंडाला स्कार्फ बांधून या विद्यापीठात शिरला. त्यानंतर मुलींच्या खोलीमध्येही गेला, आणि नंतर तो वसतीगृहाच्या बाहेर पडला. या मुलींनी त्याचा व्हिडीओ काढला आणि तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने यावर एक चौकशी समिती गठीत केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. मात्र विद्यापीठाकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
व्हायरल होणारा व्हिडीओ अकोला (Akola) विद्यापीठातील गेट क्रमांक सहाजवळच्या मुलींच्या वसतिगृहातला (Girls Hostel) आहे. पुरूषांसाठी प्रवेशबंदी असलेल्या या वस्तीगृहात चक्क एक विद्यार्थी तोंडाला मुलीसारखा कापड बांधून घुसल्याचं त्यामध्ये दिसून येतंय. या विद्यार्थ्याला त्या मुलींच्या वसतीगृहात शिरण्यासाठी तिथल्या काही मुलींनीच मदत केल्याची माहिती समोर आली आहे. हा विद्यार्थी वसतिगृहात शिरताना त्याला कोणीही विरोध केला नाही, त्याची कोणतीही चौकशी करण्यात आली नाही.
विद्यार्थीनींनी पैज लावल्याची माहिती
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth Akola) वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थीनींनी त्या मुलासोबत पैज लावल्याची माहिती समोर येत आहे. तू आमच्या वसतीगृहात येऊ शकत नाहीस, येऊन दाखव असं आव्हान त्याला दिलं होतं. त्यानंतर या मुलाने मुलींचा स्कार्फ बांधत या वसतीगृहात प्रवेश केला. वसतीगृहातील एका खोलीमध्ये हा विद्यार्थी इतर मुलींसोबत बोलताना दिसतोय. त्यानंतर तो मुलगा स्कार्फ बांधून पुन्हा बाहेर जाताना दिसतोय. तिथे असणाऱ्या विद्यार्थीनींपैकीच एकीने हा व्हिडीओ (Viral Video) काढल्याचं स्पष्ट होतंय.
या घटनेनंतर पुरूषांना प्रवेशबंदी असलेल्या वस्तीगृहात एखादा मुलगा कसा घुसू शकतो? वस्तीगृहातील सुरक्षा व्यवस्थेचं काय?, हे प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर विद्यापीठ प्रशासन खडबडून जागं झालं असून त्यांनी चौकशीचा आदेश दिल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यात निष्काळजी होत असल्याचं समोर आलं आहे. वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसंदर्भात अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत. ही घटना खूपच गंभीर असून अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत, तसंच वसतिगृहात विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या अनुषंगाने कृषी विद्यापीठ प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- अखेर बुलढाण्यातील 'तो' उपोषणकर्ता 5 दिवसांनी सापडला; पण बेपत्ता झाले कसे? प्रश्न अद्याप अनुत्तरीतच
- Majha Impact : अखेर चार महिन्यात झुरळ खुर्द गावाला मिळणार पूल आणि रस्ता, एबीपी माझा'च्या बातमीची विधिमंडळात दखल