आमदार अमोल मिटकरी आणि शिवा मोहोडांमधील वाद मिटवण्यासाठी महेबूब शेख अकोल्यात
Akola News Update : अमोल मिटकरी यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी थेट कमिशनखोरीचा आरोप केला होता. हा आरोप चक्क पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर करण्यात आला होता.
अकोला : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोडा (Shiva Mohoda) यांच्यातील वाद मिटवण्यासाठी पक्षश्रेष्ठींचा निरोप घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख (Mahebub Sheikh) आज आकोल्यात आले आहेत. यावेळी शेख यांनी अमोल मिटकरी आणि शिवा मोहोड यांची भेट घेतली.
अमोल मिटकरी यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी थेट कमिशनखोरीचा आरोप केला होता. हा आरोप चक्क पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर करण्यात आला होता. अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथे चार दिवसांपूर्वी पक्षाच्या आढावा बैठकीत हा प्रकार घडला होता. या आरोपांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी मौन सोडत आमदार अमोल मिटकरींनी हे सारे आरोप फेटाळून लावत कमिशनखोरीचे आरोप करणाऱ्या शिवा मोहोड यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर परत शिवा मोहोड यांनी आमदार मिटकरींवर पलटवार करीत काही गंभीर आरोप लावले होते. आमदार मिटकरी यांच्यावर आरोप करताना मोहोड यांनी त्यांच्या चारित्र्य आणि संपत्तीवर प्रश्न उपस्थित केले होते.
अकोल्यातील या वादात पक्षाचीची बदनामी होत असल्याने पक्षश्रेष्ठींचा निरोप घेऊन अकोला राष्ट्रवादीतील या वाद-विवादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख अकोल्यात आले आहेत. महेबूब शेख यांचं काल रात्री अकोल्यात आले आहेत. आज अमोल मिटकरी आणि शिवा मोहोड यांची महेबूब शेख यांनी स्वतंत्रपणे भेट घेतली. दोघांतही समेट घडवून आणण्याचे महेबूब शेख यांचे प्रयत्न सुरू अहेत. दरम्यान, पक्षाकडून मिटकरी आणि मोहोड या दोघींनाही माध्यमांशी न बोलण्याची तंबी देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीतील सूत्रांनी दिली आहे.
...आणि ठिणगी पडली
28 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे एका कार्यक्रमासाठी अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथे आले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी मुर्तिजापूर येथेच पक्षाची एक आढावा बैठक घेतली होती. ही बैठक गाजली ती काही पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनी. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी थेट मिटकरींच्या विरोधात तक्रारींच्या फैरी झाडल्या. माजी नगरसेवक विशाल गावंडे यांनी अमोल मिटकरींनी स्वत:च्याच कुटासा गावात 15 कोटींचा विकासनिधी दिल्याचा आरोप केला. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी आमदार मिटकरींवर कमिशनखोरीचे आरोप केले. पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडूनही कामासाठी कमिशन घेतल्याचा आरोप या व्हिडीओत करण्यात आलाय. व्हिडीओत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्हिडीओ शुटींग बंद करण्याची सूचना केल्याचं दिसतंय.
व्हिडीओ व्हायरल
शिवा मोहोड यांनी केलेल्या आरोपांचा 'तो' व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. या बैठकीत उपस्थित पक्षाच्या एका महिला पदाधिकाऱ्याने हा व्हिडीओ चित्रित केल्याचं बोललं जातंय. तेथूनच हा व्हिडीओ सर्वांकडे गेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. हा व्हिडीओ माध्यमांच्या हाती लागल्यावर 'त्या' बैठकीतील गरमा-गरमी बाहेर आली आहे.
आरोप फेटाळत मिटकरींचा शिवा मोहोडांवर पलटवार
या आरोपांनंतर आमदार अमोल मिटकरी दोन दिवसांपासून शांत होते. मात्र, आज अखेर आपल्यावरील कमिशनखोरीच्या आरोपांवर अमोल मिटकरींनी मौन सोडलं. आपल्यावर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनं केलेले कमिशनखोरीचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. अकोल्यात 'एबीपी माझा'शी अमोल मिटकरींनी संवाद साधत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. शिवा मोहोड यांचं चरित्र आणि चारित्र्य तपासावं असा पलटवार यावेळी आमदार मिटकरींनी केला आहे. शिवा मोहोड यांच्यावरचे आरोप आणि गुन्हे तपासावेत. शिवा मोहोड यांचा विकासनिधीसाठी एकही प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाहीय. त्यांनी त्यांच्याकडचा प्रस्ताव दाखवावा असं आव्हानही यावेळी मिटकरींनी मोहोड यांना दिलं आहे.
अकोल्यात पक्षातील काही प्रस्थापितांकडून आपली कोंडी होत असल्याचा खळबळजनक आरोपच आमदार अमोल मिटकरींनी केला आहे. या लोकांनी सातत्यानं आपला अपमान, अवहेलना आणि चारित्र्यहनन केल्याचं ते म्हणालेत. पक्षातूनच आपल्यावर होत असलेल्या आरोपाचा बोलविता धनी कोण आहे? हे लवकरच माध्यमांसमोर उघड करणार असल्याचा इशाराच आमदार अमोल मिटकरी यांनी दिला होता.
शिवा मोहोडांचे आमदार अमोल मिटकरींवर गंभीर आरोप
अकोल्यात राष्ट्रवादी पक्षात पदाधिकारी आणि आमदारांकडून एकमेकांवर गंभीर आरोप प्रत्यारोप होत आहेत. शिवा मोहोड यांनी थेट मिटकरी हे कामासाठी कमिशन घेत असल्याचा आरोप केला होता. यासोबतच मिटकरींवर महिलांसंदर्भात गंभीर आरोप केले होते. काँग्रेसच्या एका महिला पदाधिकाऱ्याला 10 लाख रूपये देऊन एक प्रकरण मिटविले आणि पुण्यातील पक्षाच्या एका महिला पदाधिकाऱ्याला तीन दिवस अकोल्यात कशासाठी ठेवले? असे सवाल उपस्थित करण्यात आले होते. सोबतच मिटकरींनी घेतलेल्या 80 लाखांचा भूखंड आणि 30 लाखांच्या चारचाकी गाडींचे आर्थिक स्त्रोत कोणते? यासंदर्भातही मोहोड यांनी प्रश्न उपस्थित केले होते.
काय म्हणाले महेबूब शेख?
महेबूब शेख अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, शेख प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, या संदर्भात युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षांसोबत बोलणं झालेलं आहे. त्यांनी केलेले आरोप हा गैरसमजातून झालेला प्रकार आहे. आमदारांवर तसे काही आरोप केलेले नाहीत, ज्या काही गोष्टी गैरसमजातून बाहेर आल्या आहेत.
कोण आहेत आरोप करणारे शिवा मोहोड?
1) राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष.
2) अकोला महापालिकेतील माजी सभागृहनेते. कौलखेड आणि तुकारामचौक भागात मोठी ताकद.
3) शिवा मोहोड यांच्या पत्नी किरण अवताडे यांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या.