![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Amol Mitkari : ... म्हणून आपली भूमिका संशयाच्या भोवऱ्यात, अमोल मिटकरींनी राज्यपालांना दिलं संविधानाच्या प्रतीसह खरमरीत पत्र
Bhagat Singh Koshyari : अकोल्यातील कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात आमदार अमोल मिटकरींकडून राज्यपालांचं 'खोचक' स्वागत करण्यात आलं आहे.
![Amol Mitkari : ... म्हणून आपली भूमिका संशयाच्या भोवऱ्यात, अमोल मिटकरींनी राज्यपालांना दिलं संविधानाच्या प्रतीसह खरमरीत पत्र NCP Amol Mitkari letter to Bhagat Singh Koshyari governer Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth Akola Amol Mitkari : ... म्हणून आपली भूमिका संशयाच्या भोवऱ्यात, अमोल मिटकरींनी राज्यपालांना दिलं संविधानाच्या प्रतीसह खरमरीत पत्र](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/07/4b7796989c7d398b0ad47a46519080931657213484_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अकोला : घाईघाईत घेतलेली फ्लोअर टेस्ट, राजकारण्यांना भरवलेले पेढे, 12 आमदारांची प्रलंबित यादी यामुळे आपली भूमिका वारंवार संशयाच्या भोवऱ्यात येताना दिसते, असं असलं तरी आपण संविधानाचा नेहमी सन्मान करत असाल असं खरमरीत पत्र राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपालांना दिलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज अकोल्यातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दीक्षांत समारंभासाठी आले होते. त्यावेळी मिटकरींनी त्यांना संविधानाच्या प्रतिसह हे पत्र दिलं.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज अकोल्याच्या दौऱ्यावर होते. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचे अध्यक्ष म्हणून ते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी दीक्षांत समारंभातच राज्यपालांना संविधानाच्या प्रतीसह एक पत्र दिलं आहे. या पत्राची सध्या सर्वच ठिकाणी चर्चा सुरू आहे. कारण या पत्रात आमदार मिटकरींनी राज्यपालांना चांगलेच शाब्दिक 'फटकारे' मारले आहेत. या पत्रात राज्यपालांच्या दुटप्पी भूमिकेवर मिटकरींनी सडकून टीका केली आहे.
बहूमत चाचणी, विधानसभा अध्यक्षांची निवडणूक, 12 आमदारांची यादी आदी गोष्टींमधून राज्यपालांनी आपण पक्षपाती असल्याचं दाखवून दिल्याचा खळबळजनक आरोप मिटकरींनी आपल्या पत्रातून केला आहे. किमान आपण दिलेली संविधानाची प्रत वाचून तरी राज्यपाल सुधारतील असा टोला मिटकरींनी आपल्या पत्रातून केला आहे.
काय लिहिलं आहे आमदार मिटकरींच्या पत्रात :
प्रति,
महामहिम राज्यपाल,
श्री. भगतसिंह कोश्यारी साहेब.
प्रथमत: कोरोना नंतरच्या काळात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलपती म्हणून 36 व्या दीक्षांत समारंभास आपण स्वत: हजर राहत असल्याने कृषी विद्यापीठ सदस्य म्हणून 'भारतीय संविधानाची' प्रत देउन सन्मानित करतांना आनंद होतो आहे. कारण देशातील लोकशाहीची समता, स्वातंत्र्य व बंधुता ही मूल्ये याच संविधानात आहेत.
पी.सी. अलेक्झांडर हे लोकांचे राज्यपाल म्हणून महाराष्ट्राच्या जनतेस आजही स्मरणात आहेत. आपण शिवप्रेमी आहात व संविधानप्रेमी असाल याबाबत तरी आशादायी आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपण अनेकदा घटना बाह्य वागलात असे मत विविध घटनातंज्ञांनी व्यक्त केले. मग घाईघाईत घेतलेली फ्लोअर टेस्ट, राजकारण्यांना भरवलेले पेढे, 12 आमदारांची प्रलंबित यादी यामुळे आपली भूमिका वारंवार संशयाच्या भोवऱ्यात येतं असली तरीही आपण संविधानाचा नेहमीच सन्मान करत असाल, याबाबत शंका नाही. आपण शिवनेरी व रायगड स्वतः चढून गेलात हा प्रत्येक मराठी माणसासाठी अभियानाचा क्षण होता.
छत्रपती शिवरायांचाच विचार ज्या भारतीय राज्यघटनेत आला, तिचे पालन व संरक्षण आपण निश्चितच करावे या अपेक्षेपोटी आपणास ही संविधानाची प्रत देताना आनंद होतोय. आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)