(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dhananjay Munde : गडकरी साहेबांनी उमेदवारी दिली नसती तर माझा राजकीय जन्म झाला नसता, वाचा नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे
नितीन गडकरी साहेबांनी मला विधानपरिषदेची उमेदवारी दिली नसती तर माझा राजकीय जन्मच झाला नसता असे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं.
Dhananjay Munde : नितीन गडकरी साहेबांनी ( Nitin Gadkari) 2010 मध्ये मला भाजपच्या युवा आघाडीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून विधानपरिषदेची उमेदवारी दिली. ही उमेदवारी जर त्यांनी दिली नसती तर माझा राजकीय जन्मच झाला नसता असे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी केलं. माझ्यासारखं राजकीय वाण गडकरीसाहेबांमुळे जन्माला आल्याचे मुंडे म्हणाले.
कृषीमंत्री पदाची जबाबदारी मिळावं हे स्वप्नं होतं
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तीन दिवसीय शिवार फेरीच्या उद्धघाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे विद्यापीठात दाखल झाले आहेत. यावेळी आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुंडे बोलत होते. गडकरी साहेबांनी उमेदवारी दिल्यामुळेच माझा राजकीय जन्म झाल्याचे मुंडे म्हणाले. दरम्यान, मला कृषीमंत्री पदाची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभारही धनंजय मुंडे यांनी मानले. शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी कृषीमंत्री पदाची जबाबदारी मिळावं हे स्वप्नं होतं असेही मुंडे म्हणाले.
बदलत्या नैसर्गिक परिस्थितीनुसार शेतीचा पॅटर्न बदलावा
शेती हा व्यवसाय म्हणून स्विकारा असेही मुंडे म्हणाले. बदलत्या नैसर्गिक परिस्थितीनुसार शेतीचा पॅटर्न बदलावा लागेल असेही ते म्हणाले. पेरल्यानंतर 21 दिवसही पाऊस पडला नाही तर पिक जगलं पाहिजे अशा पिकांच्या जाती तयार व्हाव्यात असे मुंडे म्हणाले. दरम्यान, सभा सुरु असतानाच पाऊस सुरु झाला. गडकरी साहेब जिथे जातात तिथे पाऊस येतो. गडकरी साहेबांनी थोडं मराठवाड्यात यावं तिथेही पाऊस येईल असेही मुंडे म्हणाले.
नितीन गडकरींनी केंद्रात कृषीमंत्री पदाची जबाबदारी घ्यावी
नितीन गडकरी साहेबांनी केंद्रात कृषीमंत्री पदाची जबाबदारी घ्यावी असे वक्तव्य देखील धनंजय मुंडे यांनी केलं. राज्यातील शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी कृषीमंत्री पदाची जबाबदारी मिळावं हे माझं स्वप्नं होतं असेही मुंडे म्हणाले. दरम्यान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं एक आदर्श गाव निर्माण करावं. त्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या व्हायला नको असे मुंडे म्हणाले. तसेच त्यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नयेत असं आवाहन देखील केलं.
महत्त्वाच्या बातम्या: