(Source: Poll of Polls)
Vidhan Sabha Election : अकोल्यात महायुतीत मिठाचा खडा? बाळापूर विधानसभेतून एकनाथ शिंदेंच्या शिलेदारानं ठोकला शड्डू!
Maharashtra Assembly Election 2024 : भाजपने अकोल्यातील पाचही विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. तर शिवसेना शिंदे गटाने बाळापूरसह अकोट विधानसभा मतदारसंघाची मागणी केली आहे.
अकोला : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर अकोल्यात (Akola) जागा वाटपावरून महायुतीत (Mahayuti) वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यातील विधानसभेच्या पाच मतदारसंघापैकी चार जागांवर सध्या भाजपचे (BJP) आमदार आहेत. तर बाळापूर विधानसभा मतदारसंघात (Balapur Vidhan Sabha Constituency) शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहे. भाजपने जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. तर शिवसेनेच्या शिंदे गटाने बाळापूरसह अकोट विधानसभा मतदारसंघाची मागणी केल्याने दोन्ही पक्षात जागा वाटप करून मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
बाळापूर विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ (Rameshwar Pawal) यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. ते पक्षाकडे बाळापुरातून उमेदवारी मिळावी, यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. यासोबतच पक्षाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पवळ यांना उमेदवारी देण्याची मागणी पक्षाकडे केली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे राज्य समन्वयक असलेले नरेश म्हस्के खासदार झालेले असताना दुसऱ्या राज्य समन्वयकांना शिंदे विधानसभेची उमेदवारी देणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
बाळापुरातून विजयश्री खेचून आणणार
यासंदर्भात शिवसेनेचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ म्हणाले की, मतदारसंघावर दावा करणे हा प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे. मात्र महायुतीतील जागावाटप हे पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेतूनच होईल. अकोला लोकसभा मतदारसंघातील बाळापुर, अकोट आणि रिसोड या तीन मतदारसंघावर आमचा दावा आहे. बाळापूर हा आमचा नैसर्गिक दावा असलेला मतदारसंघ आहे. पक्षाने आपल्याला संधी दिली तर निश्चितच बाळापुरातून विजयश्री खेचून आणू. नितीन देशमुखांनी मतदारसंघात कोणताही विकास केलेला नाही. नितीन देशमुख यांचं राजकारण ब्लॅकमेलिंगच आहे. त्यांच्याकडे कोणत्या ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप असतील त्या त्यांनी खुशाल लोकांसमोर आणाव्यात, असे त्यांनी म्हटले आहे.
कोण आहेत रामेश्वर पवळ ?
रामेश्वर पवळ हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राज्य समन्वयक आहेत. 1990 सालापासून ते राजकारणात सक्रीय आहेत. अकोला, वाशीम आणि बुलढाणा हे तिन्ही जिल्हे त्यांचे राजकीय कार्यक्षेत्र आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटन सचिव आणि प्रदेश सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केले आहे. राष्ट्रवादीत असताना शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. राष्ट्रवादीत असताना राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांना त्यांनी पक्षात आणले होते.
आणखी वाचा
एकनाथ खडसेंनी सुनेला लोकसभेत पोहोचवलं, आता मुलीसाठी सोयीस्कर राजकारण; चंद्रकांत पाटलांचा टीकेचा बाण