(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Akola News : अकोला जिल्ह्यातील 23 हजाराहून अधिक शेतकऱ्यांचे आधार लिंक नाही, सन्मान निधी मिळण्यात अडचणी
Akola News : अकोला (Akola) जिल्ह्यातील 23 हजार 669 लाभार्थ्यांचे आधार लिंक नाही. त्यामुळं सन्मान निधीची रक्कम मिळण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहे.
Akola News : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गात (PM Kisan Samman Nidhi) दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना (Farmers) सहा हजार रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार लागते. लाभार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडणं आवश्यक आहे. मात्र, सद्यस्थितीत अकोला (Akola) जिल्ह्यातील 23 हजार 669 लाभार्थ्यांचे आधार लिंक नाही. त्यामुळं सन्मान निधीची रक्कम मिळण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहे.
जिल्ह्यातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये होणार आधार लिंक
बँक खाते आधार क्रमांकाला जोडण्यासाठी पोस्ट विभागाने गावात सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना तीन हप्त्यात दोन हजार रुपयांप्रमाणं वर्षाला सहा हजार रुपये मानधन देण्यात येते. या योजनेचा 13 वा हप्ता जमा करण्याची कारवाई सध्या सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याची बँक खाते आधार क्रमांक जोडणे बंधनकारक आहे. अन्यथा, लाभार्थ्यांना 13 व्या हप्त्याचा लाभ होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट विभागाद्वारे लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत उघडण्याची तसेच ते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्ट मास्तरमार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना तत्काळ आधार लिंक करता येणार आहे.
27 फेब्रुवारीला जमा होणार PM किसानचा 13 वा हप्ता
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता या महिन्यात बळीराजाच्या खात्यात जमा होणार आहे. योजनेतंर्गत तेरावा हप्ता 27 फेब्रुवारी रोजी खात्यात जमा होणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. या योजनेचा लाभ केवळ आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होईल. आधार सीडिंग प्रलंबित लाभार्थ्यांनी बँकेत जाऊन आधार सीडिंग ई-केवायसी (eKYC PMKisan) करुन घ्यावे, त्यासाठी महा-ई-सेवा केंद्र चालकांची मदत घ्यावी अथवा बँक खाते आयपीपीबीमध्ये (इंडियन पोस्ट पेमेंट बँक) भारतीय डाक विभागामार्फत उघडण्यात यावेत. ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी (EKYC) झालेले नाही, अशा शेतकऱ्यांनी आपल्या बँकेत जाऊन ई केवायसी पूर्ण करुन घ्यावे अथवा त्यासाठी महा ई-सेवा केंद्र चालकांची मदत घ्यावी किंवा त्या शेतकऱ्यांनी बँक खाती इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये उघडावीत, असे आवाहन करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: