Ahmednagar News : शेवगावमध्ये 20 दिवसांनी पाणी, नगरपरिषदेसमोरच महिलांचे 'मुक्काम ठोको' आंदोलन
Ahmednagar News : शेवगावमध्ये 20-20 दिवस पाणी येत नसल्याने शेवगाव शहर नागरी कृती समितीच्या वतीने नगरपरिषद कार्यालयासमोर 'मुक्काम ठोको' आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
अहमदनगर : जिल्ह्यातील अनेक भागात सध्या दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांना 5-5 दिवसातून एकदा पाणी येत आहे. तर शेवगाव (Shevgaon) शहरात देखील 20-20 दिवस पाणी (Water Crisis) येत नसल्याने शेवगाव शहर नागरी कृती समितीच्या वतीने नगरपरिषद कार्यालयासमोर 'मुक्काम ठोको' आंदोलन (Agitation) सुरू करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य हर्षदा काकडे (Harshada kakade) यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या आंदोलनात शेकडोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्या आहेत. शहरात नियमित आणि पूर्ण दाबाने पाणीपुरवठा (Water Supply)व्हावा, 87 कोटी 20 लाख रुपये मंजुरीची नवीन पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरु व्हावी, शहरातील अंतर्गत रस्ते, सांडपाणी व्यवस्था आणि विद्युतीकरण त्वरीत व्हावे अशा मागण्या कृती समितीच्या आहेत. विशेष म्हणजे आंदोलकांनी नगर परिषद समोरच चूल मांडून भाकरी बनवण्यास सुरुवात केली.
मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार
जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत नगरपरिषद कार्यालयासमोर मुक्काम ठोकला जाईल, असा इशारा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या हर्षदा काकडे यांनी दिला आहे. निवडणुकीच्या वेळी मतं मागण्यांसाठी नेते आमच्याकडे येतात. मात्र निवडणूक संपली की त्यांचा तिकडेच दहावा-तेरावा होतो अशी संतप्त प्रतिक्रिया महिलांनी यावेळी दिली आहे.
आमदार मोनिका राजळे यांनी राजीनामा द्यावा
तसेच शेजारच्या पाथर्डी तालुक्यात दोन दिवसाला पाणी मिळते तर शेवगावला 20-20 दिवसातून पाणी का? असा सवाल करत शेवगावच्या आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) या सपशेल नापास झाल्या असून त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. शेवगाव शहरातील शेकडो महिला या नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलन करत असताना मुख्य कार्यकारी अधिकारी मात्र कार्यालयात उपस्थित नव्हते. महिलांनी थेट जेवणासह मुक्काम ठोकोचा निर्धार केल्याने आता प्रशासन नेमकी यावर काय तोडगा काढत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे बळीराजावर दुहेरी संकट
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात सध्या दुष्काळ सदृश्य (Drought) परिस्थिती पाहायला मिळत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे येतील शेतकरी (Farmers) संकटात सापडला आहे. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्धव्यवसाय करतो. मात्र जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाल्याने दूध उत्पादनात (Milk Production) घट झाल्याने दुग्धव्यवसाय देखील अडचणीत सापडला आहे. अहमदनगरपासून (Ahmednagar News) जवळच असलेले गुंडेगाव (Gundegaon) हे दुग्ध व्यवसायासाठी गुंडेगाव ओळखले जाते. जवळपास 10 हजार लिटरपेक्षाही जास्त गुंडेगावचं दररोजचे दूध संकलन आहे. मात्र मागील दोन ते तीन महिन्यांपासून गुंडेगावमध्ये जनावरांच्या चाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याचाच परिणाम म्हणून गुंडेगावचे दूध संकलन जवळपास 30 टक्क्यांनी कमी झाले आहे.
आणखी वाचा
जनावरांचं टॅगींग पूर्ण करा, अन्यथा खरेदी विक्रीस मनाई, अहमदनगरमध्ये 18 लाख टॅगिंग पूर्ण