Beed News: वैजनाथाचं दर्शन घेऊन धनुभाऊ थेट जगन्मित्र कार्यालयात; वाल्मिक कराडच्या समर्थकांची गर्दी
Walmik Karad: वाल्मिक अण्णा जिथे बसून बीड जिल्ह्याचा राज्यशकट चालवायचे त्या कार्यालयाला धनंजय मुंडे यांनी गुरुवारी भेट दिली. वाल्मिक कराडला मकोका लागल्यानंतर परळीत तणाव.
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली मकोका लावण्यात आलेल्या वाल्मिक कराडला बीड न्यायालयाने बुधवारी 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. वाल्मिक कराडच्याविरोधातील कारवाईमुळे परळीसह जिल्ह्यातील काही भागात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे गुरुवारी परळीत आले होते. धनंजय मुंडे यांनी परळीतील वैजनाथ मंदिरात जाऊन देवपूजा केली. देवदर्शन झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपला मोर्चा परळीतील जगमित्र कार्यालयाकडे वळवला.
धनंजय मुंडे हे काहीवेळापूर्वीच जगमित्र कार्यालयात पोहोचले. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीत याच कार्यालयात बसून बीडच्या राजकारणाची सूत्रे हाताळायचे. आज धनुभाऊ याठिकाणी आल्याने त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. एरवी आपल्या कामांसाठी वाल्मिक कराडच्या या कार्यालयात लोकांचा राबता असतो. आजदेखील काही लोक आपापली कामं घेऊन या कार्यालयात आले होते. या लोकांनी आज धनंजय मुंडे यांची भेट घेतली.
वाल्मिक कराडला कोठडीत ठेवलेल्या बीड पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा विशेष बंदोबस्त
वाल्मिक कराड याला 7 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यामुळे तो सध्या एसआयटीच्या कोठडीत आहे. एसआयटीच्या माध्यमातून बीड शहर पोलीस ठाण्यात कराडची चौकशी सुरू असल्याने बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक तर विशेष पोलीस पथकाचे जवान या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. खंडणी प्रकरणात सीआयडीची 14 दिवसांची कोठडी संपल्यानंतर कराड एसआयटीच्या ताब्यात असून सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर सध्या बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर बंदोबस्त वाढविण्यात आला असून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची नोंद केली जाते आहे.
वाल्मिक कराडामुळे धनंजय मुंडेंची कोंडी
वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटचे सहकारी मानले जातात. त्यामुळे वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख हत्याप्रकरणात गुन्हा दाखल होऊन मकोका लागल्यानंतर धनंजय मुंडे यांची कोंडी झाली आहे. धनंजय मुंडे राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, मनोज जरांगे यांच्यासह विरोधकांनी लावून धरली आहे. मात्र, अजित पवारांनी तुर्तास धनंजय मुंडे यांना अभय दिले आहे.
आणखी वाचा
राज्य मंत्रिमंडळाची बैठक, पण धनंजय मुंडे परळीतच; वाल्मिक कराड फसल्याने धनुभाऊंची पुरती कोंडी