ठाकरेंशी मी स्वतः लढायला तयार, कधीही या! गद्दारी काय असते ते सांगू का? राहुल कनालांची आदित्य ठाकरेंना थेट धमकी
Rahul Kanal On Aaditya Thackeray : माझ्यावर ईडी, आयटीने छापेमारी केल्यावर मी प्रामाणिक असल्याचं तुम्ही म्हणाला होता, मग आता तुम्हाला सोडून गेल्यावर गद्दार कसा झालो असा सवाल राहुल कनाल यांनी विचारला.
अहमदनगर : ठाकरेशी मी स्वतः लढायला तयार आहे, कधीपण ते येऊदेत, असं थेट आव्हान शिंदे गटाचे सोशल मीडिया सेलचे प्रमुख राहुल कनाल यांनी आदित्य ठाकरे यांना दिलं आहे. गद्दारी काय असते ते सांगू का? असा धमकीवजा इशाराही त्यांनी दिला. सिनेट निवडणूक आणि गद्दार शब्दावरून राहुल कनाल यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
एकेकाळचे आदित्य ठाकरे यांचे जवळचे असलेले मात्र आता शिंदे शिवसेनेत प्रवेश केलेले राहुल कनाल यांनी साई दर्शन केलं. शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी खिचडीचे वाटपदेखील केलं. साई दर्शनानंतर राहुल कनाल यांनी ठाकरे पिता-पुत्रांवर टीका करत जोरदार हल्लाबोल केला. राहुल कनाल हे साईबाबा संस्थानचे विश्वस्तसुद्धा राहिलेले आहेत.
जे बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व होते तेच एकनाथ शिंदे यांचे हिंदुत्व आहे. उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व काय हे सर्वजण पाहताहेत. एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या मार्गाने चालले असून आम्ही तेच हिंदुत्व पुढे नेत आहोत असं राहुल कनाल म्हणाले.
सिनेटवरून आदित्य ठाकरेंना आव्हान
राहुल कनाल यांनी थेट आदित्य ठाकरे यांना आव्हान दिलं. ते म्हणाले की, आम्ही जेव्हा ठाकरेंसोबत होता तेव्हा 50 टक्के सभासद आम्ही नोंदवले आहेत. जिथे नोंदणी केली तिथेच मतदान करण्याची मानसिकता असते. तुम्ही खुल्या निवडणुका घ्या आणि लढा. मी स्वतः तुमच्याशी लढायला तयार आहे. कधीपण या, मी आव्हान देतो.
गद्दारी काय असते ते सांगू का?
गद्दारी काय असते ते तुम्हाला सांगू का असं म्हणत राहुल कनाल यांनी थेट ठाकरेंना इशारा दिला. ते म्हणाले की, आम्ही कोविड काळात सेवा करत होतो तेव्हा आम्ही गद्दार नव्हतो. पक्षाचे काम करतो होतो तेव्हा आम्ही गद्दार नव्हतो. तुम्ही शंभर वेळा आमच्या घरी आला, शंभर वेळा सार्वजनिक आमचे कौतुक केले. माझ्यावर ईडी, आयटीची रेड झाली तेव्हा मी प्रामाणिक असल्याचे तुम्हीच बोलला होता. मग आता तुमच्या सोबत नसल्यावरच लोक गद्दार असतात का? गद्दारी काय असते हे मी तुम्हाला सांगू का? तुम्हाला ऐकायचे असेल तर सांगतो.
आम्ही फक्त एकनाथ शिंदे आणि महायुततीचे धोरणं लोकांसमोर घेऊन जातोय. फेक नेरेटिव्ह आणि खालच्या पातळीवर जाण्यापेक्षा सकारात्मक राजकारणावर आमचा भर आहे. आम्हाला विरोधकांसारख्या फेक नेरेटिव्हची गरज नाही असं राहुल कनाल म्हणाले.