Ahmednagar : हे गेल्या 50 वर्षांपासून राजकारण करतात, पण 50 वर्षांपूर्वी दिलेलं आश्वासन आजही देतात, असा कुठे नेता असतो का? निलेश लंके यांचं सुजय विखेंना जोरदार प्रत्युत्तर
Nilesh Lanke Reply To Sujay Vikhe Patil : दिवाळी फराळ खाऊ घातल्याने कुणी लोकनेता होत नाही, तसं असतं तर प्रत्येत तालुक्याचा आमदार हा हलवाई असता अशी टीका भाजपचे खासदार सुजय विखेंनी केली होती.
अहमदनगर: काही लोक आपण 50 वर्षांपासून राजकारण करत असल्याचं सांगतात, पण 50 वर्षांपूर्वी लोकांना दिलेलं आश्वासन आजही देत आहेत, असा कुठे नेता असतो का? असं सनसनीत प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी भाजपचे खासदार सुजय विखे पाटलांना (Sujay Vikhe Patil) दिलं आहे. दिवाळीच्या फराळ कार्यक्रमावरून सुजय विखेंनी निलेश लंके यांच्यावर टीका केली होती.
राजकीय नेत्यांनी आयोजित केलेल्या दिवाळी फराळावरून भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांचे नाव न घेता बोचरी टीका केली होती. दिवाळी फराळ खाऊ घातल्याने कोणी लोकनेता होऊ शकत नाही, तसे असते तर प्रत्येक तालुक्याचा आमदार हा हलवाई झाला असता असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यावर आता आमदार निलेश लंके यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, काही नेते आपण पन्नास वर्षांपासून जिल्ह्याचं राजकारण करत असल्याचं सांगत आहेत. मात्र काही ज्येष्ठ लोक आम्हाला सांगतात की, गेल्या पन्नास वर्षांपूर्वी त्यांनी दिलेले आश्वासन अजूनही देत आहेत. असा नेता कुठे असतो का?
सध्या राज्यात राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि भाजप एकत्र सत्तेत आहेत, मात्र त्यांच्या आमदार, खासदारांमध्ये राजकीय जुगलबंदी सुरू असल्याचं यातून समोर आले आहे. आमदार निलेश लंके आणि खासदार सुजय विखे हे जरी राज्यातील महायुतीत एकत्रित असले तरी स्थानिक पातळीवर दोघांमधला संघर्ष सुरूच आहे.
राणीताई लंके लोकसभेच्या रिंगणात?
भाजपच्या सुजय विखेंच्या विरोधात आता राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके निवडणूक लढवणार अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. त्याचं कारण म्हणजे वेगवेगळ्या कार्यक्रमात त्यांचे बोर्ड झळकायला सुरूवात झाली आहे. तसेच एकाच घरात दोन मतप्रवाह असू शकतात असं सूचक वक्तव्य निलेश लंके यांनी केलंय. त्यामुळे राणीताई लंके यांनी लोकसभेची तयारी सुरू केली असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
सध्या भाजप आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट हा महायुतीत सत्तेत आहे. मात्र तरी देखील कधी निलेश लंके तर कधी राणीताई लंके यांच्या लोकसभा उमेदवाराची उमेदवारीची चर्चा रंगत असते. याबाबत बोलताना स्वतः राणीताई लंके यांनी हे बॅनर कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत, त्यांच्या मनात ज्या भावना आहेत त्याचा नक्कीच विचार होईल. पण पक्षश्रेष्ठींचा विचार घेऊनच पुढे निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलं आहे.
ही बातमी वाचा: