Maharashtra Dairy Farmers : मागण्यांची त्वरीत अंमलबजावणी करा, अन्यथा आंदोलन; दूध उत्पादकांचा प्रभात दूध कंपनीला इशारा
अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील प्रभात (लॅक्टीलीस) दूध कंपनीनं शेतकऱ्यांच्या मागण्यांची त्वरी अंमलबजावणी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Maharashtra Dairy Farmers : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील प्रभात (लॅक्टीलीस) दूध कंपनीनं (Prabhat Dairy) दूध उत्पादकांच्या (Milk production) मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी करावी, अन्यथा पुन्हा आंदोलनाच्या मार्गाने जावं लागेल, असा इशारा दूध उत्पादक शेतकरी समितीनं (Milk Producing Farmers Committee) दिला आहे. मागण्यांच्या अंमलबजावणीची मुदत संपत आली आहे. मात्र, अद्यापही अंमलबजावणी होत नसल्याने संघर्ष समितीनं मागण्यांचे स्मरणपत्र राज्याचे दुग्ध विभाग सेक्रेटरी, दुग्ध आयुक्त, विभागीय दुग्धविकास अधिकारी आणि कंपनी प्रशासनास दिले आहे.
Farmers Demand : शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय?
दूध उत्पादक शेतकऱ्यांचा 31 मार्च 2021 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीचा 18 महिन्यांचा सविस्तर हिशोब प्रत्येक शेतकऱ्याला लेखी दया, हिशोबाची शिल्लक रक्कम शेतकऱ्यांना त्वरित अदा करा अशी मागणी शेतकऱ्यांनी बैठकीत केली होती. कंपनीने रीबिटसह सर्व लेखी हिशोब शेतकऱ्यांना द्यावा असे निर्देश तहसीलदारांनी कंपनी प्रतिनिधी यांना दिले होते. मिल्कोमीटरचे सेटिंग बदलता येत असल्याने सेटिंग बदलून शेतकऱ्यांची लुट होते. वजन आणि गुणवत्ता मापनामध्येही फेरफार करुन लूट होते. ही लूट थांबवण्यासाठी पारदर्शक पद्धतीचा अवलंब करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती.
सकारात्मक निर्णय घेण्याचे बैठकीत मान्य केले होते
प्रभात दूध कंपनीसोबत झालेल्या बैठकीत सर्व मशीन शेतकरी प्रतिनिधींच्या समक्ष तपासून घेण्याचे मान्य करण्यात आले होते. शेतकऱ्यांना कोठेही दूध घालता यावं यासाठी लाभांश, रिबीट, प्रोत्साहन अनुदान आदीसाठी 70 टक्के किंवा इतर अटी लादण्याची पद्धत त्वरित बंद करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. कंपनीच्या वरिष्ठांशी बोलून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे बैठकीत मान्य करण्यात आले आल्याची माहिती किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिली आहे.
अद्याप मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही
शेतकऱ्यांच्या वरील मान्य मागण्यांची अंमलबजावणी दिनांक 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत करण्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र, दिनांक 18 फेब्रुवारीपर्यंत याबाबत कोणतीही अंमलबजावणी झालेली नसल्याने संबंधितांना मान्य मागण्यांची अंमलबजावणी करावी असे स्मरणपत्र संघर्ष समितीने दिले आहे. मान्य मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास यापूर्वी स्पष्ट करण्यात आल्याप्रमाणं वरील मागण्यांसाठी आंदोलनाच्या मार्गानं जावे लागेल असा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.
दूध संकलन 85 हजार लिटरवरुन 35 हजार
शेतकऱ्यांच्या देणीबाबत मागील काही दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. प्रभात कंपनीकडून दिवाळीपूर्वी अकोले तालुक्यात 85 हजार लिटर दूध संकलन करण्यात येत होते. मात्र रीबिटबाबतचे 70 टक्के दूध कंपनीलाच घालण्याची सक्ती करणारे शेतकरी विरोधी धोरण व दूध वजन आणि गुणवत्ता मापनाबाबत संशयास्पद व्यवहारामुळे शेतकऱ्यांनी कंपनीकडे पाठ फिरवली असल्याचे समितीने म्हटले. कंपनीचे तालुक्यातील संकलन प्रतिदिन 85 हजार लिटरवरुन 35 हजार लिटरवर खाली आले आहे. आपला व्यवहार सुधारुन शेतकऱ्यांचा विश्वास पुन्हा मिळवण्याऐवजी कंपनीने पोबारा करण्याचे धोरण स्वीकारलेले दिसत असल्याचा आरोप किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे नेते डॉ. अजित नवले यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: