(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agriculture News : बदलत्या हवामानाचा 'ज्वारी'ला फटका, ज्वारीचं माहेरघर असणाऱ्या खर्ड्यातील शेतकरी चिंतेत
Agriculture News : अहमदनगरच्या (Ahmednagar) जामखेड येथील खर्डा (Kharda) परिसरात हवामान बदलाचा ज्वारीच्या पिकाला (jowar Crop) मोठा फटका बसला आहे.
Agriculture News : बदलत्या हवामानाचा शेती पिकांवर (Agriculture Crop) मोठा परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. थंडीतील चढ उतारामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. अहमदनगरच्या (Ahmednagar) जामखेड येथील खर्डा (Kharda) परिसरात हवामान बदलाचा ज्वारीच्या पिकाला (Jowar Crop) मोठा फटका बसला आहे. ज्वारीच्या पिकावर चिकटा, मावा, लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
अहमदनगरच्या जामखेड येथील खर्डा परिसराची ज्वारीचं माहेरघर अशी ओळख आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ज्वारीचं उत्पादन घेतलं जातं. मात्र, यावर्षी ज्वारी उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण हवामान बदलामुळे ज्वारीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. ज्वारीचं पीक हुरड्यात आलेलं असताना चिकटा, मावा, लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो क्विंटल ज्वारीचं उत्पादन देणाऱ्या खर्डा परिसरातील शेतकरी आता हवालदिल झाला आहे.
खर्डा कृषी मंडळामध्ये 9 हजार 873 हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी
खर्डा कृषी मंडळामध्ये 29 गांवामध्ये 9 हजार 873 हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. मात्र, हवामानातील बदलामुळे ज्वारी पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. थंडी उशिराने पडली आहे. मागील काही दिवसापूर्वी ढगाळ वातावरण तयार झालं होतं. यामुळे पिकावर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी बागायती भागात ज्वारीची पाने लाल पडू लागली आहेत. सध्या मावा आणि चिकट्याचा प्रादुर्भाव जास्त आहे. लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी आहे. याबाबत कृषी विभागाने काही उपाययोजना करण्यास सांगतिले आहे. यामुळ प्रादुर्भव कमी होत असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.
एकीकडे बदलत्या हवामानाचा तर दुसरीकडे रानडुकरांचा पिकांना फटका
एकीकडे बदलत्या हवामानाचा ज्वारी पिकावर परिणाम होत असतानाच दुसरीकडे खर्डा परिसरात रानडुकरांचा उपद्रव वाढताना दिसत आहे. डुकरांनी ज्वारी पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी केली आहे. अनेक ठिकणी ज्वारीचं पीक खाली पडलं आहे. याचा परिणाम कडब्यावर होणार आहे. त्यामुळे यावर्षी ज्वारीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्वारीबरोबरच राज्यात इतरही पिकांना बदलत्या हवामानाचा फटका बसत आहे. कापूस, हरभरा, केळी या पिकांवर बदलत्या हवामानामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: