कोपरगाव गोळीबार प्रकरण, अजित पवार गटाच्या आमदारावर गंभीर आरोप, भाजप नेत्याने थेट दाखवलं 'ते' स्टेटस
Ahmednagar News : कोपरगाव येथे गुरूवारी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणी आता भाजप नेत्याने विद्यमान आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत.
अहमदनगर : येथील कोपरगाव (Kopargaon) येथे गुरूवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास गोळीबार झाल्यामुळे खळबळ उडाली होती. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर ही गोळीबाराची घटना घडली होती. या गोळीबारात तन्वीर बालम रंगरेज हा तरुण जखमी झाला होता. या प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 8 जणांना अटक करण्यात आली आहे. आता या गोळीबार प्रकरणात कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) आणि त्यांचे स्वीय सहाय्यकांवर भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी गंभीर आरोप केले आहेत.
कोपरगाव गोळीबार प्रकरणानंतर भाजप नेते विवेक कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळे आणि त्यांचे स्वीय सहायक जोशी यांच्यावर गंभीर आरोप केलेत. इतकंच नाहीतर गोळीबार करणारा आरोपी नाझिम शेख आमदार आशुतोष काळे यांचा कार्यकर्ता आहे. आरोपीने आमदार काळे यांचे बॉस असं म्हणून स्टेटस ठेवल्याचंही विवेक कोल्हे यांनी म्हटले आहे. याबाबत फोटो आणि व्हिडिओ देखील विवेक कोल्हेंनी दाखवले.
आरोपींनी गोळीबार करण्याआधी आमदारांचे 'बॉस' म्हणून ठेवले स्टेटस
विवेक कोल्हे म्हणाले की, कोपरगाव शहरातील गोळीबार प्रकरणात जे आरोपी अटक केले त्या आरोपींनी गोळीबार करण्याआधी आमदारांचे बॉस म्हणून स्टेटस ठेवले होते. आरोपीने आमदारांचे फ्लेक्स लाऊन बॉस म्हणून संबोधित केलं असून आमदार आरोपींना राजाश्रय देतात का? असा आरोप त्यांनी आमदार आशुतोष काळेंवर केला आहे. आरोपी नाझिम शेख आमदार आशुतोष काळे यांचा कार्यकर्ता असल्याचेही त्यांनी म्हटले.
अवैध व्यवसायांना विद्यमान आमदारांचा राजाश्रय
ते पुढे म्हणाले की, कोपरगाव शहरात राजरोसपणे अवैध व्यवसाय सुरू आहेत. शहरात गुन्हा करणारे लोक आमदारांचा बिल्ला लाऊन शहरात फिरतात. शहरातील गुन्हेगारांवर कुठलाही वचक राहिला नाही. अवैध व्यवसायांना विद्यमान आमदार राजाश्रय देताय, असा आरोप देखील विवेक कोल्हे यांनी केला आहे.
पोलीस आरोपींवर काय कारवाई करणार?
आमदार म्हणाले विरोधकांना गाडून टाका. येणाऱ्या निवडणुकीत जनता आमदारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. जखमी व्यक्तीने गोळीबार करणाऱ्यांची माहिती दिली आहे. पोलीस आरोपींवर काय कारवाई करणार? असा सवाल विवेक कोल्हेंनी उपस्थित केला. शहरात घडणाऱ्या गुन्ह्याबाबत आम्ही वेळोवेळी गृहमंत्र्यांना माहिती दिली आहे. अवैध व्यवसाय बंद व्हावे यासाठी आंदोलन मोर्चे देखील काढले आहे. स्थानिक राजकीय दबावापोटी गुन्हेगारांवर कुठलीही कारवाई होत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा