कुख्यात गुंड निलेश घायवळ अन् भाजप आमदार राम शिंदे एकत्र देवदर्शनाला, व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ
Nilesh Ghaiwal and Ram Shinde : कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांचा सोबत फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
अहमदनगर : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा (Nilesh Ghaiwal) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सोबतचा फोटो शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही महिन्यांपूर्वी ट्विट केला होता. यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. आता निलेश घायवळ सोबत आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असल्याने चर्चांना उधाण आले आहे.
गुंड निलेश घायवळसोबत आमदार राम शिंदे एकत्र
कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांचा जामखेड येथील नागेश्वराच्या यात्रेत सोबत फिरतानाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झालाय. नागपंचमी निमित्ताने जामखेडच्या नागेश्वराची यात्रा असते. या यात्रेत गुंड निलेश घायवळ आणि भाजप आमदार राम शिंदे एकत्रित दिसून येत आहेत. निलेश घायवळवर पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
कोण आहे निलेश घायवळ?
निलेश घायवळ हा पुण्यातील सराईत गुन्हेगारांपैकी एक गुन्हेगार आहे. निलेश घायवळ हा एक गुन्हेगारांचा टोळी प्रमुख असून त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गजानन मारणे विरुद्ध घायवळ टोळी असा थराराचा पुण्यात इतिहास असून दोन्ही टोळ्यांनी आपले वर्चस्व दाखवण्यासाठी पुण्यात अनेक कारनामे केले आहेत. कधीकाळी गजानन मारणे आणि निलेश गायवळ हे एकमेकांचे साथीदार होती. एकमेकांनी एकत्र गुन्हा घडवले होते. या दोघांना शिक्षा देखील झाली होती. जेलमधून बाहेर आल्यानंतर गजानन मारणे आणि निलेश घायवळ यांच्यात वाद होऊन दोघांची फाटाफूट झाली. निलेश घायवळवर पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात विविध प्रकारचे 14 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागणे या सारखे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. खून, खूनाचा प्रयत्न असेही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्याच निलेश घायवळचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतच्या भेटीचा फोटो काही महिन्यांपूर्वी संजय राऊत यांनी ट्विट केला होता. यानंतर निलेश घायवळ भाजप आमदार राम शिंदे यांच्या सोबत दिसून आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
निलेश घायवळचा मंत्रालयात फिरतानाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल
दरम्यान, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही एक्स या समाजमाध्यमावर निलेश घायवळसह काही जण मंत्रालयात फिरतानाचा व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता. मंत्रालयात गुंड निलेश घायवाळ रील तयार करतो, त्याच्या सोबत इतर गुंड देखील आहेत. हे कशी काय एवढी हिंमत करतात? मुख्यमंत्र्यांना भेटायला जातो हे कसं काय शक्य होतंय? गुंडांना सोबत घ्यायची वेळ मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागत आहे, अशी टीका त्यांनी केली होती.
आणखी वाचा