Ahmednagar News: विखे-थोरात एकाच बांधावर! बळीराजा हवालदिल, नेते मात्र श्रेयवादात मश्गुल
Ahmednagar News: अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बांधावर गेलेले मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले.
Ahmednagar News: एकीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने ( Unseasonal rains in Maharashtra) झोडपून काढले आहे. त्यामुळे हजारो हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे नेतेमंडळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी न करता एकमेकांवर चिखलफेक आणि श्रेयवाद करत असल्याचे चित्र आज अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar) पाहायला मिळाले.
गेल्या तीन दिवसांपासून नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यांत अवकाळी पावसाने कहर केला असून शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दोन दिवसांपासून नुकसान झालेल्या भागांत पाहणी करत आहेत. आज ते अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर होते. अशातच माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. मात्र दोन्ही नेत्यांनी एकाच शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी केली. मात्र एक नेता आधी आला, तर दुसरा काही वेळानंतर. मात्र या पाहणी दौऱ्यात मात्र शेतकऱ्यांचे दुःख समजून घेता या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत दौरा केला. शेतकरी नुकसान पाहणीपेक्षा या श्रेय वादाच्या दौऱ्याची चर्चा चांगलीच रंगली.
अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील गावात अवकाळी पावसाने नुकसान केलं असून बळीराजा संकटात सापडला आहे. संगमनेर तालुक्यातील निमगाव, सावरचोळ, पेमगिरीसह परिसरात अवकाळी पावसाने मोठं नुकसान केल, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात महसूलमंत्री विखे यांचा कालच दौरा ठरला आणि आज सकाळी विखे पाटील येण्याअगोदरच माजी महसूलमंत्री थोरात शेताच्या बांधावर पोहचले. दुपारी 12 वाजता थोरात यांचा दौरा सुरू झाला आणि तो संपण्यापूर्वीच विखे पाटील सुद्धा याच भागात पोहचून पाहणी दौरा केला. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जाहीर टीका केली नसली तरी शाब्दिक चिमटे मात्र काढण्यास विसरले नाही.
यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, अयोध्येला जाऊन आले रामाच दर्शन ही घेतले हे खरं आहे, मात्र शेतकऱ्यामध्ये खरा राम आहे, अशी परिस्थिती असेल तर खरा राम सुद्धा तिथे थांबला नसेल, असा टोला लगावताना आज फिरत आहेत, आता उद्याच्या कॅबिनेट मध्ये शेतकऱ्याला भरीव मदत होईल, अशा निर्णयाची अपेक्षा असल्याच वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलं.
दुसरीकडे बाळासाहेब थोरात ज्या शेताच्या बांधावर पाहणी करून गेले. त्याच ठिकाणी थोड्यावेळाने महसूलमंत्री विखे पाहणी करायला पोहचले. टोमॅटो, डाळिंब, झेंडूसह नुकसान झालेल्या फळबागांची पाहणी विखे यांनी सुद्धा केली. तीही त्याच बांधावर हे विशेष. पाहणीनंतर राधाकृष्ण विखे यांनी सुद्धा प्रतिक्रिया देताना थोरात यांच्यावर जाहीर टीका केली नसली तरी थोरातांच्या अयोध्या दौरा टीकेला उत्तर दिलं आहे. अयोध्येच्या रामाला आम्ही साकडं घालूनच आलो. त्यामुळे ज्यांच्यात राम शिल्लक राहिला नाही, त्यांच्या टीकेला महत्व देण्याची गरज नाही, असा टोला थोरात यांना लगावला.
बळीराजाच्या नुकसानीच काय?
एकूणच आज एकाच तालुक्यातील सारख्या गावांचा आजी माजी महसूलमंत्र्यांनी दौरा केला आहे. मात्र दौरे करण्यापेक्षा आम्हाला भरीव मदत द्या, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली. माजी महसूलमंत्री थोरात यांच्या मतदारसंघात महसूलमंत्री विखे पाटील यांनी दौरा केल्यानंतर आजच संध्याकाळी बाळासाहेब थोरात सुद्धा विखे यांच्या राहाता मतदारसंघात दौरा करणार आहे.. त्यामुळे या राज्यातील दोन मातब्बर नेत्यांमध्ये सुरू असलेले राजकारण बळीराजाच्या पदरात काय पाडणार हे आगामी काळात स्पष्ट होईल.