Samrudhhi Highway : 'पोटातलं पाणीही हलणार नाही, असा समृद्धी महामार्ग, पण वाहने जपून चालवा', मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याचे आवाहन
Samrudhhi Highway : समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहने काळजीपूर्वक चालवण्याचे आवाहन केले.
Samrudhhi Highway : समृद्धी महामार्गामुळे (Samrudhhi Highway) शेतकऱ्यांची समृद्धी झाली. नागपूर ते मुंबई असा ग्रीन कॉरिडॉर असून हा सरळ रस्ता असल्याने पोटातले पाणी देखील हालत नाही, त्यामुळे आम्ही चार तासात नागपूर ते शिर्डी पोचलो, मात्र तुम्ही घाई करू नका, तुम्ही पाच तास घ्या, जीव पण महत्त्वाचा असल्याचे सांगत महामार्गावर सावधानता बाळगून गाडी चालवा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले.
आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. ते म्हणाले, मी साईबाबांच्या (Sai baba) चरणी नतमस्तक होऊन त्यांचे आभार मानतो, येत्या सहा ते आठ महिन्यात तिसरा टप्पा देखील सुरू करू अशी आशा आहे. ज्यावेळी एकनाथ शिंदे रस्ते विकास विभागाचे मंत्री होते, मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा आम्ही हे स्वप्न बघितले, ग्रीन फिल्ड महामार्ग हे स्वप्न वाटत होते, अनेकांना वाटत होतं, हे होणार नाही, मात्र समृद्धी महामार्गाचे काम सुरु झाले असून दहा वर्ष काम सुरू राहील असे सांगत 'अंदाज कुछ अलग है, मेरे सोचने का, सबको मंजिल का ख्वाब है, मुझे रास्ते बनाने का! अशी शेरोशायरी सुद्धा फडणवीस यांनी यावेळी केली.
ते पुढे म्हणाले की, सर्व आमदारांची बैठक घेतली, आम्ही राज्यातले सर्व संपादक बोलावले, त्यांची मदत घेतली, कारण प्रकल्पाला त्यांची साथ महत्त्वाची होती. आम्ही अभूतपूर्व असा भूसंपादनाचा दर दिला. याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे सभा घेऊन महामार्ग होऊ देणार नाही, असे सांगितले. त्याचबरोबर शरद पवार यांनी नगरला बैठक घेऊन हा मार्ग होणार नाही असे सांगितले. मात्र ज्या गावाने विरोध केला, त्या गावात एकनाथ शिंदे यांनी जाऊन ग्रामस्थांची समजूत काढली. त्याचबरोबर सर्वानी आपली कागदपत्रे जमा केली. त्यावेळी रेकॉर्ड ब्रेक वेळेत भूसंपादन करण्यात यश आल्याचे फडणवीस म्हणाले.
राज्याच्या 15 जिल्ह्याचे भविष्य बदलणार
देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, पहिल्या टप्प्याच्या वेळी विरोधी पक्षाचे आमदार भेटले, आम्हाला खरंच वाटत नाही. आज दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होत आहे. समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या 15 जिल्ह्याचे भविष्य बदलणार आहे. मात्र सद्यस्थितीत अपघातांचे प्रमाण वाढत असून ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लवकर करण्यावर भर आहे. शिवाय हा महामार्ग सरळ असल्यानं चालकाला झपकी येते. त्यामुळे लोकांनी यावर कमी वेगात गाडी चालवावी, असे आवाहन देखील फडणवीस यांनी केले. तसेच फडणवीस पुढे म्हणाले की, ट्रान्स हार्बर लिंक, कोस्टल रोड, समृध्दी मार्ग पूर्ण होत असून हे सर्व मार्वेल प्रकल्प आहेत. पुढे नागपूर ते गोवा, मुंबई ते गोवा महामार्ग करायचे आहेत. नागपूर गोवा मुळे मराठवाड्यात प्रचंड समृद्धी येणार आहे. मुख्यमंत्री स्वतः याबद्दल उत्सुक असतात. ते काम करत असल्याने हा सर्व शक्य होत असल्याचे सांगत आम्ही फाईल वर बसणारे लोक नाहीत, काम करणारे लोक आहोत अशी उपरोधिक टीकाही फडणवीस यांनी केली.
आम्ही दिलेला शब्द पाळला...
तर यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील समृद्धी महामार्गाचे कौतुक करताना आम्ही दिलेला शब्द पाळल्याचे सांगितले. यावेळी ते म्हणाले की, पुढचा शेवटचा टप्पा या डिसेंबरमध्ये पूर्ण होईल. तसेच आम्ही जाहीरपणे करतो, काही लोकांप्रमाणे घरात बसून चर्चा करत नाहीत. तसेच सत्य काही लपत नसते, आमचे जे काही असते ते मोकळे असते, अशी टीकाही ठाकरे गटावर केली आहे. त्यावेळी मंत्री असताना काही काम नव्हते, तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, तुम्हाला असे काम मिळेल की, दुसरे करायचे गरज नाही, खऱ्या अर्थाने ते शक्य होत आहे. समृद्धी महामार्गासाठी अनेकांनी विरोध केला, विरोध करायला लावला, तेव्हा हे मला फोन करायचे, काही ठिकाणी आमचे पुतळे फास लावलेले असायचे. मात्र शेवटी हा महत्वाचा प्रकल्प मार्गी लागला आहे.
घाई करू नका, जीव महत्वाचा आहे...
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी खूप मेहेनत घेतली असून त्यांचा दूरदर्शीपणा कामी आला. त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान मोदी यांनी देखील सर्व अडथळे दूर करून टाकले. काही जण विचारायचे समृद्धी कोणाची झाली, मी म्हणायचो शेतकऱ्यांची झाली. हा रस्ता शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडवणारा रस्ता आहे. हा सरळ रस्ता असल्याने पोटातले पाणी देखील हालत नाही, त्यामुळे आम्ही चार तासात नागपूर ते शिर्डी पोचलो, मात्र तुम्ही घाई करू नका, तुम्ही 5 तास घ्या, जीव पण महत्त्वाचा असल्याचे सांगत महामार्गावर सावधानता बाळगून गाडी चालावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.