IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर 51 टक्के दिव्यांग, दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर
IAS Pooja Khedkar Certificate : एक 40 टक्के दिव्यांग प्रमाणपत्र तर दुसरं 20 टक्के प्रमाणपत्र असं दोन्ही एकत्रित करून पूजा खेडकरांनी 51 टक्के दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर आलं आहे.
अहमदनगर: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांच्याबाबत आणखी एक खुलासा समोर आला आहे. पूजा खेडकर यांनी अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून सुरूवातीला दोन दिव्यांग प्रमाणपत्र काढली होती. नंतर त्या दोन्ही अपंग प्रमाणपत्रांचे एकत्रिकरण करून एकच प्रमाणपत्र देण्यात आलं असून त्यामध्ये पूजा खेडकर या 51 टक्के अपंग असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून पूजा खेडकर यांना दोन प्रमाणपत्र देण्यात आले होते. नंतर ते दोन्ही प्रमाणपत्रं एकत्र करून एकच दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले होते. 2018 साली जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय मंडळाने दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रात खेडकर यांना 40 टक्के दिव्यांग तर 2021 साली मानसिक आजाराच्या प्रमाणपत्रात 20 टक्के दिव्यांग असल्याच प्रमाणपत्रात नमूद असल्याचे डॉ. संजय घोगरे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, पुन्हा मार्च 2021 मध्ये ही दोन्ही प्रमाणपत्रं एकत्र करून देण्यात आली होती. दोन्ही प्रमाणपत्राची बेरीज जरी 60 टक्के होतं असली तरी सॉफ्टवेअरने ऑटो जनरेटर करून 51 टक्के दिव्यांगत्व असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
प्रमाणपत्रात कोणतीही खाडाखोड नाही
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2020 मध्ये मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. या प्रमाणपत्रांबाबतची कागदपत्रं सापडली आहेत. अहमदनगरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे आणि जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांमध्ये बैठक पार पडली होती. पूजा खेडकर यांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कोणत्याही प्रकारची खाडाखोड झाली नसल्याचं डॉ. घोगरे यांनी सांगितलं.
MBBS प्रवेश घेताना पूजा खेडकर फिट
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरांनी (IAS Pooja Khedkar) एम.बी.बी.एसचे शिक्षण पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केलं आहे. तिथे प्रवेश घेताना त्यांनी पूर्णतः फिट असल्याचं, कोणताही आजार नसल्याचं सर्टिफिकेट सादर केलं होतं.
त्यावेळी पूजा खेडकरांचे वडील दिलीप खेडकर हे क्लास वन अधिकारी असताना देखील ओबीसी कोट्यातून प्रवेश घेताना नॉन क्रिमीलियर सर्टिफिकेट देखील सादर केलं असल्याचं समोर आलं आहे. त्यांचे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे नगरचे एसडीओ यांचे आहे अशी माहिती देखील समोर आली आहेवैद्यकीय शिक्षण घेताना त्यांनी आपलं नाव पूजा दिलीपराव खेडकर म्हणून नोंद केलं होतं.
त्यानंतर आता पूजा खेडकरांनी आयएएस होण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलेले आहे. दिव्यांग कोट्यातून त्यांना नोकरीही मिळाली. वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेताना अपंगत्व प्रमाणपत्र दिलेले नाही, मग यूपीएससीच्या वेळीच त्यांना दिव्यांगपणा आला का असा? प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
ही बातमी वाचा :