Ajit Pawar: निलेश लंकेंच्या होमग्राऊंडवर अजित पवारांचं जोरदार भाषण, शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर योजना, सगळी वीज मोफत मिळवण्याचा प्लॅनही सांगितला
Maharashtra Politics: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. अजितदादा आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आजच्या सभेत पारनेरमध्ये महिलांशी संवाद साधला. अजित पवारांनी सांगितली शेतकऱ्यांसाठीची खास योजना

अहमदनगर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी अहमदनगरच्या दौऱ्यात जोरदार भाषण करताना शेतकरी आणि महिला वर्गाला साद घालण्याचा प्रयत्न केला. शरद पवार गटाचे निलेश लंके हे नगरचे खासदार आहेत. त्यांचे होमग्राऊंड असलेल्या पारनेरमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांची सभा झाली. अजित पवार यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे रस्त्यात लोकांच्या भेटीगाठी घेत येताना अजित पवार यांना पारनेरमध्ये पोहोचायला उशीर झाला. मात्र, त्यानंतर अजित पवार यांनी जोरदार भाषण ठोकत आगामी काळात राज्य सरकारच्या योजनांमुळे शेतकरी आणि महिला वर्गाचे कशाप्रकारे भले होणार आहे, हे सविस्तरपणे सांगितले.
लाडकी बहीण योजनेनंतर विरोधक सरकारने लाडक्या भावांसाठी काही केले नाही, अशी टीका करतात. पण राज्य सरकार लाडक्या भावांसाठीही निर्णय घेत आहे. त्याचे उदारण देताना अजित पवार यांनी सौरपंप योजनेचे फायदे उपस्थित महिलावर्गाला समजावून सांगितले. त्यांनी म्हटले की, ही गोष्ट माझ्या माय माऊलींनी लक्षामध्ये घ्या आणि ते सांगायला आवर्जून पारनेरमध्ये मी आलेलो आहे. तुम्ही मोठ्या संख्येने आलात. मला थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारण येताना थांबत थांबत यावं लागलं होतं. याचबरोबर तुम्ही जे शेतकरी असेल त्यांचं तीन हॉर्स पॉवर, पाच हॉर्सपॉवर, साडेसात हॉर्सपॉवरचं बील आम्ही माफ केले आहे. लाईट बील माफ. त्याच्यामध्ये 14 हजार कोटीची जबाबदारी आम्ही उचलली आणि आता इथून पुढे तुमच्या शेतकरी म्हणून वीज पाहिजे असेल तर सोलर पंप आम्ही तुम्हाला देणार आहोत. तिकडे तारा ओढा, तसंल काही नाही. पॅनल बसतील विहीरजवळ तीनची मोटार, पाचची मोटार, साडेसातची मोटार, महाराष्ट्रात साडेआठ लाख सोलर पंप देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे अजितदादांनी सांगितले.
सौरपंप योजनेचा कसा फायदा होणार?
अजित पवार यांनी आपल्या भाषणात मोफत सौरपंप योजनेचे फायदे समजावून सांगितले. त्यामुळे पुढे काय होणार आहे माहिती आहे का तुम्हाला? दिवस उजाडला, सूर्य उगवला, आठ वाजता सोलरचे पॅनल तापणात, तुमची मोटार चालू. त्याला ती वीज सूर्यापासून मिळणार आहे, पैसे भरायचे नाहीत. बिल थकलंय, कनेक्शन तोडलंय, आकडा टाकलाय, भानगड नाही. पती शेतकरी तिथं पिकाला पाणी देतील फळबागांना पाणी देतील फुलझाडांना पाणी देतील आणि तुमची शेती पिकवतील. रात्र संध्याकाळ झाली सूर्य मावळला की मोटर बंद. कारण सूर्य असेल तरच ते चालतं. रात्री शेतकऱ्यांनी कारभाऱ्यांनी घरी जायचं, कारभारणीने केलेलं जेवण जेवायचं आणि मुलाबाळांच्यात राहायचं आणि झोपायचं. आता काय होतंय काही दिवस सकाळी आणि काही दिवस रात्रीच्यावेळी शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना जावं लागतंय.
आमच्या शिरूर तालुक्यामध्ये, जुन्नर तालुक्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये, खेड तालुक्यामध्ये बिबट्या यायला लागलेत रात्री आणि त्याच्यामुळे शेतकरी पण घाबरायला लागला. घरातील महिलांना पण वाटतं याला नवरा गेलाय पाणी धरायला किंवा पिकाला पाणी पाजायला पण बिबट्याने हल्ला केला तर काय? ही काळजी आता राहणार नाही आणि बिबट्यांच्या करता वेगळा बंदोबस्त आम्ही केलेला तो सांगून मी तुमचा वेळ घेत नाही. अशा पद्धतीने विंचू काट्याचं रात्री-अपरात्री आपल्या कारभाऱ्याला तिकडे पाणी द्यायला जायची गरज नाही. अशाप्रकारची आपण ही योजना आणलेली आहे. साडेआठ लाख पंप आणि नऊ हजार मेगावॅट वीज आम्ही सोलरवर देत आहोत. दीड वर्षात ही योजना सुरु होईल. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळायला लागेल. ही योजना लाडक्या भावांसाठी नाही का, ही चांगली योजना नाही का, असा सवाल अजित पवार यांनी विचारला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
