Ahmednagar : पालकमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतीला भेट दिली अन् शेतकऱ्याच्या अश्रूचा बांध फुटला, नगरमधील अवकाळीग्रस्त शेतकरी ढसाढसा रडला
Ahmednagar Wadule Agriculture : ज्या पिकाला पोटाच्या मुलासारखं वाढवलं, लाईट नसताना पाणी देण्यासाठी उसणवारी करून डिझेल इंजिनचा वापर करून फळबागा, उसासारखी पिकं जगवली, तेच पीक काही क्षणात जमीनदोस्त झालं.
![Ahmednagar : पालकमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतीला भेट दिली अन् शेतकऱ्याच्या अश्रूचा बांध फुटला, नगरमधील अवकाळीग्रस्त शेतकरी ढसाढसा रडला ahmednagar wadule agriculture news radhakrishna vikhe patil visit to unseasonal rain affected farmer maharashtra news Ahmednagar : पालकमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतीला भेट दिली अन् शेतकऱ्याच्या अश्रूचा बांध फुटला, नगरमधील अवकाळीग्रस्त शेतकरी ढसाढसा रडला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/30/b8562e81379cd8750fdb5139e1c3e287170136442287693_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदनगर : राज्यामध्ये आठवडाभरापासून वादळ वारे, अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातलंय. हजारो हेक्टरवरील शेती पिकं अक्षरशः उद्ध्वस्त झालीत. अहमदनगरच्या (Ahmednagar) पारनेर तालुक्यात तर वादळी वाऱ्यासह आलेल्या गारपिटीने शेतकऱ्यांची उभी पिकं जमीनदोस्त झाली आहेत. ज्या भागात परतीचा मान्सून कमी झाल्याने दुष्काळाची स्थिती निर्माण होते त्या भागात या अवकाळीने होत्याचं नव्हतं केलं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी दाटलंय. जेवढा मोठा बागायतदार तेवढं मोठं नुकसान अशीच काहीशी परिस्थिती झालीय पारनेरच्या वडुले गावच्या पठारे कुटुंबाची.
रविवारी चार वाजेच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली. आभाळातला बाप रुसला आणि हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावून नेला. पारनेर तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगात असलेलं हे वडूले नावाचं गाव. गावातील शेत जमीन प्रामुख्याने डोंगराच्या आजूबाजूला, पाण्याचा मोठा स्रोत नाही. आधी दुष्काळाचा सामना केलेल्या या गावातील शेतकऱ्यांनी कसंबसं सावरत शेती फुलंवली खरी, मात्र अवकाळीने त्यांच्या संपूर्ण पिकांची नासाडी केली.
पठारे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर
पारनेर तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे आज पारनेर तालुक्यात आले आणि या शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. विजय पठारे आणि चार भावांची वडुले गावामध्ये 80 एकर शेती आहे. या शेतीपैकी 40 ते 42 एकरावरील असलेल्या ऊस, कांदा, लिंबू, मका आणि आंबा बागेचं गारपीट झाल्यामुळे पूर्णपणे नुकसान झालं. त्यामुळे संपूर्ण पठारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ज्या पिकाला पोटाच्या मुलासारखं वाढवलं, लाईट नसताना पाणी देण्यासाठी उसणवारी करून डिझेल इंजिनचा वापर करून फळबागा आणि उसासारखं पीक जगवलं, तेच पीक काही क्षणात जमीनदोस्त झालं. त्यामुळे पठारे कुटुंबीयांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. सरकारने गारपीट झालेल्या गावांमध्ये जास्तीत जास्त मदत करावी असं सांगताना पठारे कुटुंबीय भावुक झालेत.
गारपिटीने पठारे यांच्या शेताचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. सरकार करून करून मदत तरी किती करणार? अशी चिंता या कुटुंबाला लागली आहे. पठारे यांच्याप्रमाणेच पारनेर तालुक्यातील वडुले, निघोज, गांजीभोईरे, पानोली गावासह परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यात चार चार वर्षे जपलेल्या फळबागाचे भरून न निघणारे नुकतान झाले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
या गारपिटीने केवळ यंदाचेच पीक हातातून गेलेले नाही तर पुढच्या वर्षीचे देखील पीक कसे घ्यायचे, त्यासाठी आर्थिक तडजोड कशी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. शासकीय सोपस्कार पूर्ण होऊन मदत कधी मिळणार? पारनेर तालुक्यात उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी शिल्लक राहणार नसल्याने पुढचे पीक तरी कसे घेणार ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. आता शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या सरकारच्या मदतीकडे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)