SDRF पथकाची बोट प्रवरा नदीत कशामुळे बुडाली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला धडकी भरवणारा प्रसंग
SDRF boat capsizes in Pravara river : प्रवरा नदीपात्रात एसडीआरएफ पथकाची बोट उलटल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. आता प्रत्यक्षदर्शींनी ही घटना नेमकी कशी घडली याबाबत माहिती दिली आहे.
![SDRF पथकाची बोट प्रवरा नदीत कशामुळे बुडाली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला धडकी भरवणारा प्रसंग Ahmednagar News What caused SDRF team boat to sink in Pravara river Eyewitness told incident Akole Maharashtra Marathi News SDRF पथकाची बोट प्रवरा नदीत कशामुळे बुडाली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला धडकी भरवणारा प्रसंग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/23/d7112eb1b276d597a02513a660a0533b1716458125492923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
SDRF boat capsizes in Pravara river : उजनी धरणात बोट दुर्घटनेत (Ujani Dam Boat capsizes) सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच अकोले येथे प्रवरा नदीपात्रात (Pravara River) एसडीआरएफ पथकाची बोट उलटल्याची (SDRF boat capsizes) धक्कादायक घटना गुरुवारी घडली. यामुळे महाराष्ट्रावर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. यात चार जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांचा शोध अद्याप सुरु आहे. आता प्रत्यक्षदर्शींनी ही घटना नेमकी कशी घडली याबाबत माहिती दिली आहे.
बुधवारी दुपारी अकोले (Akole) तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदीपत्रात पोहण्यासाठी गेलेले सागर पोपट जेडगुले (25) व अर्जुन रामदास जेडगुले (18) हे दोघे तरुण बुडाले होते. त्यातील सागर जेडगुले याचा मृतदेह बुधवारी सापडला तर अर्जुन जेडगुले याचा शोध सुरू होता. या तरुणाचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र एसडीआरएफ पथकाची बोट आज सकाळी उलटली. या पथकातील पाच जण आणि स्थानिक असे एकूण सहा जण प्रवरा नदी पात्रात बुडाले. यातील तीन जणांचे मृतदेह सापडले असून अन्य दोन जणांचा शोध सुरू आहे.
एसडीआरएफ पथकातील तिघांचा मृत्यू, दोघांचा शोध सुरु
धुळे (Dhule) एसडीआरएफ बलगट क्रमांक 6 चे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे, पोलीस शिपाई वैभव वाघ व पोलीस शिपाई राहुल पावरा या तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे पोलीस दलासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर पंकज पंढरीनाथ पवार, अशोक हिम्मतराव पवार कॉन्स्टेबल या दोघांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तसेच गणेश मधुकर देशमुख (वाकचौरे) आणि अर्जुन रामदास जेडगूले यांचा शोध अद्याप सुरु आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितला धडकी भरवणारा प्रसंग
घटनेबाबत माहिती देताना सुगाव गावचे पोलीस पाटील राजेंद्र शिंदे म्हणाले की, नदीपात्रात बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी सकाळी एसडीआरएफचे पथक गावात दाखल झाले. त्यांची शोधमोहिम साडेसहा वाजेच्या सुमारास सुरू झाली होती. एसडीआरएफ पथकाच्या दोन बोट पाण्यात उतरल्या. काही वेळाने एक बोट पाण्याच्या भोवऱ्यात सापडल्याने क्षणार्धात बोट उलटली. तर दुसरी बोट पाण्यात चकरा मारत होती. बुडालेल्या बोटीतील जवान पोहण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु पाण्याच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे त्यांना वरती येता आले नाही. तर दुसरी बोट मदतीसाठी जाण्याआधीच ते बुडाले, अशी माहिती त्यांनी दिली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)