Ahmednagar News : ब्रेक फेल झालेली एसटी बस वाळूच्या ढिगाऱ्यावर चढवली, चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचा जीव वाचला
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये ब्रेक फेल झालेली एसटी बस वाळूच्या ढिगाऱ्यावर चढवल्याने अनेक प्रवाशांचा जीव वाचला. बस चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली.
Ahmednagar News : एसटी महामंडळाच्या अनेक बस (ST Bus) भंगार झाल्या आहेत. मात्र तरीही त्या रस्त्यांवर धावताना पाहायला मिळत आहेत. शिवाय मागील काही दिवसांपासून एसटी बसची दूरवस्था दाखवणारे अनेक व्हिडीओ गेल्या काही दिवसांत समोर आले आहेत. त्यातच अहमदनगरमध्ये (Ahmednagar) ब्रेक फेल झालेली एसटी बस वाळूच्या ढिगाऱ्यावर चढवल्याने अनेक प्रवाशांचा जीव वाचला. बस चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली.
ब्रेक फेल झाले होते, काही अंतरावर नदीवरील पूल होता...
अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द गावात रविवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. पंढरपूरहून नाशिकला निघालेल्या बसचे फेल ब्रेक (Break Fail) झाले होते. शिवाय काही अंतरावर नदीवरील मोठा पूल होता. ही बाब लक्षात घेऊन चालकाने बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी वाळूच्या डेपोवर बस चढवली. त्यामुळे बस थांबली आणि मोठा अनर्थ टळला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांचा जीव वाचला.
महामंडळाची बस प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. बस थांबल्यानंतर तिथे उपस्थित ग्रामस्थांनी आपत्कालीन दरवाजातून प्रवाशांना बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. चालकामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी एसटी महामंडळाच्या बसची दूरवस्था या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आली आहे.
एसटीची दूरवस्था दाखवणारे व्हिडीओ व्हायरल
काही दिवसांपासून एसटी बसची दूरवस्था दाखवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत आहेत. चार दिवसांपूर्वी गडचिरोलीतील अहेरी आगारातील लालपरीचा छप्पर फाटलेल्या अवस्थेत धावणाऱ्या बसचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील एका एसटी बसचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात एसटी बसचा चालक एका हाताने स्टिअरिंग आणि दुसर्या हाताने काचेवरील वायपर फिरवत असल्याचे पाहायला मिळत आहे. भर पावसात बसचा वायपर बंद झाल्याने चालकावर ही वेळ आल्याचे बोलले जात आहे. अशा पद्धतीने धोकादायक एसटी चालवणाऱ्या ड्रायव्हरचा व्हिडीओ काढून एका प्रवाशाने सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे पुन्हा एकदा एसटी बसची दूरवस्था समोर आली आहे.
हेही वाचा