Ahmednagar News : पीओपी साहित्याची विल्हेवाट लावावी, अन्यथा...; नगर मनपाची गणेश मूर्ती कारखान्यांना नोटीस
अहमदनगर महापालिकेने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कारखान्यांना नोटीस काढली आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती तयार न करता पर्यावरणपूरक मूर्ती तयार कराव्यात, असे नोटीसीत म्हटलंय.
Ahmednagar News : अहमदनगर महापालिकेने (Ahmednagar Municipal Corporation) प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (Plaster of Paris) गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कारखान्यांना नोटीस काढली आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती तयार न करता पर्यावरणपूरक मूर्ती तयार कराव्यात. तीन दिवसांच्या आत गणेश मूर्ती बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पीओपी साहित्याची विल्हेवाट लावावी, तसा साठा आढळून आल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपाने गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांना दिला आहे.
पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याबाबत आणि पीओपीच्या मूर्तीबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळांनी दिलेल्या पत्राच्या आधारे महापालिकेने नगर शहरातील 130 कारखानदारांना नोटीसा बजावल्या आहेत. मात्र अहमदनगर जिल्हा गणेश मूर्तिकार संघटनेने याचा निषेध करत, ही नोटीस अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे.
चुकीचा अर्थ काढत या नोटीसा बजावल्याचा दावा
पीओपी मूर्तीच्या उत्पादनाने विक्रीवर कोणतीही बंदी नसल्याचे सरकारने विधान परिषदेत मागील वर्षी स्पष्ट केले आहे. तरीही चुकीचा अर्थ काढत या नोटीसा बजावण्यात आल्याचा दावा संघटनेने केला आहे. त्यामुळे शहरातील आणि जिल्ह्यातील आणि कुटुंबांना बेरोजगार करू नये, असं मत संघटनेने व्यक्त केले आहे.
कारखानदारांनी गुंतवले लाखो रुपये
त्यातच महापालिकेने दिलेल्या नोटीसा चुकीच्या वेळी आणि चुकीच्या संदर्भाने दिल्या आहेत, असं मूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांचे म्हणणे आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सुमारे एक हजार गणेश मूर्ती कारखाने असून 5 हजार कामगार यामध्ये काम करत आहेत. त्यातच नोव्हेंबर महिन्यापासून गणेश मूर्ती बनवण्यास सुरुवात झाली असून लाखो रुपयांचे भांडवल गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांनी गुंतवले आहेत.
नागपूर खंडपीठामध्ये याचिका प्रलंबित
पीओपी मूर्तीच्या उत्पादन आणि विक्रीबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका प्रलंबित आहे. त्यातच अचानक अशी नोटीस आल्याने प्रत्येक कारखानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार असल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे.
इतर महत्वाच्या बातम्या