Ahmednagar News : राज्यात वाळू माफियांचा हैदोस! चक्क पोलीस पथकावर वाळूचा ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न
Ahmednagar News : अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या पथकावर चक्क वाळूने भरलेला ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेलाय.
Ahmednagar News अहमदनगर : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात वाळू माफियांचा धुमाकूळ पाहायला मिळत असून, आता त्यांची हिंमत एवढी वाढली की थेट पोलीस पथकावर हल्ला (Sand Mafia Attack) करण्यात येत आहे. अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या श्रीरामपूर तालुका (Shrirampur Police) पोलिसांच्या पथकावर चक्क वाळूने भरलेला ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, सुदैवाने पोलीस कर्मचारी बाजूला झाल्याने यात मोठा अनर्थ टळलाय. मात्र या घटणेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पुन्हा एकदा राज्यात वाळू माफियांचा हैदोस बघायला मिळत आहे.
चक्क पोलीस पथकावर वाळूचा ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्याच्या हद्दीत असलेल्या कामलापूर येथील गोदावरी नदीपात्रातून भर दिवसा मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे, अशी माहिती मिळाल्याने श्रीरामपूर तालुका पोलिसांचे पथक कारवाई साठी गेले होते. दरम्यान, समोर पोलीस असल्याचे माहीत होताच घटनास्थळी एकच धावपळ सुरू झाली. त्यानंतर त्यातील ज्ञानेश्वर देवीदास बनसोडे आणि संतोष कडुबा दळे यांनी वाळूने भरलेला ट्रॅक्टर पोलीस कॉन्स्टेबल वैभव काळे यांच्या अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पोलीस कर्मचारी बाजूला झाल्याने मोठा अनर्थ टळला.
तीन संशयित आरोपींवर गुन्हा दाखल
या धक्कादायक प्रकारानंतर तालुका पोलिसांनी 12 लाख रुपये किंमतीच्या चोरीच्या वाळूने भरलेले एम एच 17 एव्ही 4267 आणि एम एच 17 सीआर 2502 हे 2 ट्रॅक्टर जप्त केले आहे. तर या प्रकरणी ज्ञानेश्वर बनसोडे, संतोष दळे आणि सोमनाथ सुरासे या तीन संशयित आरोपींवर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तलवार घेऊन पथकाला धमकावले, गाडीही फोडली...
अहमदनगरच्या श्रीरामपूर प्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात देखील असाच काही प्रकार समोर आला होता. यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पथकावर थेट हल्ला करण्यात आला. चंद्रभागा पात्रात बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर तहसील पथक कारवाईसाठी गेले होते. दरम्यान, गुरसले येथे कारवाईला पथक आल्याचे लक्षात येताच वाळू माफियांनी चक्क हातात तलवार घेऊन पथकाला धमकावले. तसेच, जेसीबी आणि टीपर पळवून नेले. धक्कादायक म्हणजे कारवाईसाठी आलेल्या महसूल पथकाच्या गाडीवर दगडफेक करून गाडी फोडली होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पुन्हा एकदा वाळू माफियांची दहशत पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या