Nagpur : प्रभावी नियोजनासाठी अचूक सांख्यिकी गरजेची : माहिती संचालक
संयुक्त राष्ट्रसंघाने निश्चित करून दिलेली शाश्वत विकासाची ध्येये गाठताना प्राधान्यक्रम निश्चित करणे गरजेचे आहे. जगण्याच्या सर्व पातळीवर सांख्यिकीला महत्व असून त्याचे नियोजन व्हावे, असे बागुल म्हणाले.

नागपूर : शाश्वत विकास होऊन जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी, तसेच समाजासमोरील विविध प्रश्नांची उकल करण्यासाठी त्याचे सुयोग्य आकलन व नियोजन आवश्यक असते. यासाठी अचूक सांख्यिकी महत्वाची असून त्यातून लोकांच्या जगण्याचे वास्तव समजून घेण्यास मदत होते, असे माहिती संचालक हेमराज बागुल यांनी आज येथे सांगितले. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने राष्ट्रीय सांख्यिकी दिवसानिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे प्रादेशिक उपसंचालक मिलिंद नारिंगे, वस्त्रोद्योग उपसंचालक श्रीमती निशा पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, नियोजन उपसंचालक अनिल गोतमारे, माध्यम समन्वयक अनिल गडेकर यावेळी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रशांतचंद्र महालनोबीस यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
संयुक्त राष्ट्रसंघाने शाश्वत विकासाची 17 ध्येये निश्चित करून दिली असून ती साध्य करण्यासाठी शासनातील विविध विभागांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लोकांच्या जगण्याचा स्तर उंचावणे, हा यामागील उद्देश आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योजनांची आखणी करण्यामध्ये सांख्यिकीला अधिक महत्व असून अचूक सांख्यिकीशिवाय या योजना यशस्वी होणार नाहीत. त्यामुळे सांख्यिकी जमा करण्याची जबाबदारी असलेल्या प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोनातून काम करून शाश्वत विकासाची ध्येये गाठण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे हेमराज बागुल यांनी सांगितले.
शाश्वत विकासासाठी जगभर प्रयत्न सुरु असून जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गरजांची यादी वाढतच आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने निश्चित करून दिलेली शाश्वत विकासाची ध्येये गाठताना प्राधान्यक्रम निश्चित करणे गरजेचे आहे. तसेच जगण्याच्या सर्व पातळीवर सांख्यिकीला महत्व असून त्याचे योग्य प्रकारे संकलन, नियोजन व्हावे, असे बागुल म्हणाले.
देशाच्या विकासामध्ये असलेले सांख्यिकीचे महत्व समजावून सांगण्यासाठी प्रशांतचंद्र महालनोबीस यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून साजरा केला जात आहे. तसेच या माध्यमातून पुढील पिढीमध्ये सांख्यिकीविषयी आवड निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे नारिंगे यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्रसंघाने निश्चित केलेली शाश्वत विकासाची 17 ध्येये गाठण्यामध्ये अर्थ व सांख्यिकी संचालनालयाची भूमिका महत्वाची असल्याची सांगून ही ध्येये साध्य करण्यासाठी संचालनालयामार्फत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची त्यांनी माहिती दिली.
प्रशांतचंद्र महालनोबीस यांनी राष्ट्रीय स्तरावर सांख्यिकीमध्ये मोठे योगदान दिले आहे. देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून त्यांनी केलेली कामगिरी तसेच पंचवार्षिक योजनेसाठी त्यांनी तयार केलेले मॉडेल महत्वपूर्ण ठरल्याचे गोतमारे यांनी यावेळी सांगितले. शाश्वत मानवी विकासासाठी सामाजिक, सांस्कृतिक, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रांचा विकास होणे आवश्यक आहे. आपल्या पुढील पिढीला आजच्यापेक्षा चांगले जीवन जगता यावे, यासाठी प्रयत्न करण्यासाठी शाश्वत विकासाची ध्येये निश्चित करण्यात आली आहेत. सांख्यिकी दिनानिमित्ताने या ध्येयांवर मंथन होण्यास मदत होईल, असे पाटील यावेळी म्हणाल्या.
अर्थ व सांख्यिकी संचालानायाची विकास कामांच्या नियोजनात महत्वाची भूमिका असून सध्या संचानलयाचे बळकटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे विभागाच्या जबाबदारीतही वाढ होणार असून सर्वांनी त्यासाठी सज्ज राहणे आवश्यक असल्याचे गायकवाड यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांख्यिकी सहायक स्नेहलता बनकर यांनी केले, आभार सांख्यिकी सहायक पवन शेलकर यांनी मानले. यावेळी अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे अधिकारी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.























