Nagpur Crime : छळाला कंटाळून दारूड्या पतीची हत्या
शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी गळा आवळ्याने, डोक्यावर काहीतरी जड वस्तूचा मार लागल्याने मृत्यू झाल्याची माहिती दिली. पोलिसांनी महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता तिने पतीची हत्या केल्याचे कबूल केले.

नागपूर: दररोज दारूच्या नशेत घरी येऊन शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या पतीच्या छळाला कंटाळून एका महिलेने त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी गळा आवळला गेल्याने आणि डोक्यावर काहीतरी जड वस्तूचा मार लागल्याने मृत्यू झाल्याची माहिती दिली. पोलिसांनी महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता तिने पतीची हत्या केल्याचे कबूल केले. राणी ज्ञानी यादव (33) रा. वाजपेईनगर, जुनी कामठी रोड असे आरोपी महिलेचे नाव आहे.
शनिवारी रात्री राणीचा पती ज्ञानी मनराखन यादव (38) याचा सिलाई मशीनवर डोके आदळल्या गेल्याने मृत्यू झाला होता. ज्ञानी हा जडीबुटी विकण्याचे काम करीत होता. यादव दाम्पत्याला दोन मुली आणि एक मुलगाही आहे. राणीने आपल्या जबानीत, नेहमीप्रमाणे ज्ञानी दारूच्या नशेत घरी आला. मुलांना शिवीगाळ करू लागला आणि तिला मारहाण केली. समजवण्याचा प्रयत्न केला असता सिलाई मशीनवर डोके आदळून घेत स्वत:ला जखमी केले. त्याला उपचारार्थ मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे सांगितले होते. यावरून कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. रविवारी ज्ञानीचे शवविच्छेदन करण्यात आले. डॉक्टरांना त्याच्या गळ्यावर जखमा दिसल्या. वैद्यकीय चाचणीत गळा आवळल्या गेल्याने आणि डोक्यावर काहीतर जड वस्तूचा वार झाल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलिसांनी राणीला ताब्यात घेतले.
CNG Price Hike : नागपुरात पेट्रोल आणि डिझेलपेक्षा महाग विकलं जातंय सीएनजी
दारूच्या नशेत रोज करायचा मारहाण
चौकशी दरम्यान तिने सांगितले की, ज्ञानी दररोज दारूच्या नशेत घरी येऊन तिला मारहाण करीत होता. मुलांनाही शिवीगाळ करून मारहाण करीत होता. त्याच्या छळाला ती कंटाळली होती. त्याच्याकडून होणारा त्रास असह्य झाला होता. शनिवारी रात्रीही त्याने तिला मारहाण केली. राणीने तो नशेत असल्याची संधी साधली. त्याचे डोके सिलाई मशीनवर आदळले. आधीच दारूच्या नशेत असलेला ज्ञानी जागीच कोसळला. त्यानंतर राणीने दुपट्ट्याने त्याचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून राणीला अटक केली. मंगळवारी तिला न्यायालयात हजर केले जाईल.























