Nagpur : नागरिकांच्या सुविधेसाठी 24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत
मनपाच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी संततधार पावसातही कामाला लागले होते. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी ऑपरेशन सेंटर मधून परिस्थितीची पाहणी करुन मार्गदर्शन करीत होते.
नागपूर : सोमवारी 11 जुलै रोजी आणि त्यापूर्वी रविवारी 10 जुलै रोजी नागपूर शहरात झालेल्या संततधार पावसामुळे अनेक भागात आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती. नागपूर शहरात निर्माण होणाऱ्या आपात्कालीन परिस्थितीसाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे 24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात आले आहे. या नियंत्रण कक्षामध्ये प्राप्त तक्रारीवर प्रशासनाद्वारे तात्काळरित्या कार्यवाही करून नागरिकांना दिलासा मिळवून देण्यात आला.
सोमवारी 11 जुलै रोजी संपूर्ण शहरामधून पाणी साचणे आणि झाड पडण्याच्या प्राप्त तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. झाड पडण्याबाबत सक्करदरा झोन अंतर्गत रामभाउ शाळा, गांधीबाग झोन अंतर्गत महाल बाजारातील डीपी वर झाड पडण्याची तक्रार प्राप्त होताच संबंधित झोन पथकाद्वारे तात्काळ सेवाकार्य बजावले व रस्ता मोकळा करण्यात आला. तर पाणी साचण्याबाबत लक्ष्मीनगर झोन अंतर्गत प्रतापनगर कॅनरा बँकेजवळ शिवमुद्रा अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये, लकडगंज झोन अंतर्गत भांडेवाडी रेल्वे स्टेशन जवळ घरामध्ये, आशीनगर झोन अंतर्गत कोराडी रोड ओम साई नगर येथे, नेहरूनगर झोन अंतर्गत दिघोरी योगेश्वर नगर वस्तीमधून तक्रार प्राप्त झाली. त्यावर झोनच्या पथकांद्वारे तात्काळ कार्यवाही करण्यात आली.
मनपाच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी संततधार पावसाची तमा न बाळगता कामाला लागले होते. वरिष्ठ अधिकारी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी ऑपरेशन सेंटर मधून परिस्थितीची पाहणी करुन मार्गदर्शन करीत होते.
रविवारी 10 जुलै रोजी शहरामधून टिनशेड पडणे, पाणी साचणे आणि झाड पडण्याच्या प्राप्त तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. आशीनगर झोन अंतर्गत बेझनबाग येथील रहिवासी माजी मंत्री नितीन राउत यांच्या घरावरील टिनाचे शेड पडल्याची तक्रार प्राप्त होताच त्यावर कार्यवाही करण्यात आली. झाड पडण्याबाबत धरमपेठ झोन अंतर्गत दिनशॉ फॅक्टरी बोरगाव रोड येथील तक्रार प्राप्त झाली त्यावर कार्यवाही करण्यात आली. पाणी साचण्याबाबत सक्करदरा झोन अंतर्गत संजय गांधीनगर हुडकेश्वर पोलिस स्टेशन समोर विठ्ठल रखुमाई मंदिराच्या बाजूला, धंतोली झोन अंतर्गत शताब्दी नगर चौक बुद्ध बिहारा समोर, मानस चौकात लोखंडी पुलाखाली, चुनाभट्टी, लक्ष्मीनगर झोन अंतर्गत गोपानगर जोशीवाडी, विम्स हॉस्पीटलच्या पार्कींगमध्ये, गुरूनानक कॉलेज हॉटेल अंडर मून येथील तक्रार प्राप्त झाली. त्यावर प्रशासनाद्वारे कार्यवाही करून दिलासा मिळवून देण्यात आला.