LIVE RAIN UPDATE | मुंबईसह उपनगरातील सर्व शाळांना उद्या (05 ऑगस्ट) सुट्टी
LIVE
Background
मुंबई : मुंबई, ठाणे, कल्याण परिसरात रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. काल सकाळपासून सुरु झालेल्या पावसानं अद्याप विश्रांती घेतलेली नाही. कुर्ला, सायन, सांताक्रूझ भागातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. जोरदार पावसाचा परिणाम लोकल सेवेवरही झाला आहे. हार्बर मार्गावरची रेल्वेसेवा बंद करण्यात आली आहे. वाशी ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली आहे. कल्याण, अंबरनाथ, बदलापूर या भागातही सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरु आहे. परिणामी याचा लोकलसेवेवर परिणाम झालाय. बदलापूर आणि कल्याणमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी आलंय. त्यामुळे अंबरनाथमधून कर्जतकडे जाणारी लोकल वाहतूक सध्या बंद आहे.
रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुलुंडमध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. आताही मुलुंडमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. सायनच्या गांधी मार्केटमधल्या रस्तावर पाणी साचलंय. सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी वाहतूक बंद केली आहे.
भिवंडीतील भातसा नदीवरील वालकस पूल पाण्याखाली
भिवंडीतील भातसा नदीवरील वालकस पूल पाण्याखाली गेल्यामुळे वालकस, बेहरे, कोशिंबी, वावेघर या चार गावातील हजारो नागरिकांचा संपर्क तुटलाय. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून खवडलीच्या दिशेने प्रवास करावा लागत आहे. तसेच, खडवली स्थानकापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने पर्याय म्हणून जीव धोक्यात घालून रेल्वे रुळांवरुन नागरिकांना चालत जावे लागत आहे.
नाशिकमध्ये गोदावरी नदीला मोठा पूर
दुसरीकडे, नाशिकमध्ये गोदावरी नदीला मोठा पूर आल्यानं दुतोंड्या मारुती पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. तसंच गोदावरी नदीवरील रामसेतू पुलही पाण्याखाली गेला आहे. तर दुसरीकडं रामकुंडाच्या बाहेरील रस्त्यावर पाणी येऊन पोहोचलं असून, गुडघाभर पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागतेय. तसंच परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यावसायिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. गोदावरी नदीपात्रात अडकलेल्या एका तरुणाला नागरिकांच्या मदतीनं वाचवण्यात यश आलंय. अमरधाम जवळील नदीपात्रात अडकलेल्या युवकाला साड्या, दोरीच्या साहाय्यानं बाहेर काढण्यात यश आलं. नदीकिनारी फिरताना पाण्याचा अंदाज न आल्यानं हा तरुण नदीत वाहून जात होता. मात्र एका खांबाला धरल्यानं त्याचा जीव वाचला.
राज्यातली प्रमुख धरणं ओव्हरफ्लो
पावसाच्या जोरदार हजेरीमुळं राज्यातली प्रमुख धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. साताऱ्यातल्या कोयना धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलाय. कोयना धरणातून जवळपास 2 हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशकात देखील जोरदार पावसामुळं नांदूर मध्यमेश्वर धरण भरलं असून, प्रकल्पातून जायकवाडीच्या दिशेनं पाणी सोडण्यात आलंय. अर्थात याचा फायदा औरंगाबादला होणार आहे. मुंबईतला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि शहापूरमध्ये असलेल्या भातसा धरणातून देखील विसर्ग सुरू आहे. डोळ्याचे पारणे फेडणारी ही दृश्य आहेत. तिकडे विदर्भात देखील पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं भंडारा धरणातून पाणी सोडण्यात आलंय.
सिंधुदुर्गात किनारपट्टीला समुद्राच्या उधाणाचा फटका
जिल्ह्यातील किनारपट्टीला समुद्राच्या उधाणाचा फटका बसला आहे. वेंगुर्ला, मालवण, देवगड या तिन्ही तालुक्यात उधाणाचे पाणी किनारपट्टीलगत सकल भागात घुसले आहे.
देवगड तालुक्यातील मळई, विरवाडी, गिर्ये आणि आनंदवाडी आदी भागांत समुद्राच्या उधानाचे पाणी शिरले आहे. आनंदवाडी भागात बंदर प्रकल्पाचे भराव टाकण्याचे काम सुरू आहे. हा भराव समुद्रातील गाळ न काढता टाकण्यात येत असल्यामुळे समुद्राच्या उधानाचा पाणी यावर्षी अधिक प्रमाणात भरले आहे. समुद्राच्या उधानाचा पाणी किनाऱ्यावर आणून ठेवलेल्या नौकांपर्यंत व त्याठिकाणी असलेल्या मच्छिमारांच्या झोपड्यापर्यंत पोहचले. काही प्रमाणात स्थानिक मच्छिमारांचे नुकसानही झाले आहे. आनंदवाडी येथील रहिवासी ज्योती वरडकर यांच्या घराला पाण्याने तीन बाजूने वेढले असल्यामुळे त्यांच्या घराला धोका निर्माण झाला आहे. समुद्राच्या उधाणाचे पाणी किनारपट्टी शेजारी असलेल्या घरांमध्ये घुसल्यामुळे तसेच किनाऱ्यावर नांगरून ठेवलेल्या नौकांपर्यंत पोहचल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ व मच्छिमार हवालदिल झाले आहेत.
विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील पैनगंगा नदीला पूर
विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील पैनगंगा नदीवर असलेल्या सहस्त्रकुंड धबधबा कालपासून सुरु असलेल्या पावसामुळं ओसंडून वाहत आहे. काही दिवसांपूर्वी पुरेशा पावसाअभावी धबधबा कोरडाठाक पडला होता. मात्र, आता उमरखेड तालुक्यात 73 मिलीमीटर पाऊस झाल्यानं पैनगंगा नदीला पूर आलाय. संततधार पावसामुळं यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरुन वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झालीय. त्यामुळे सहस्त्रकुंड धबधब्यावर मन मोहून टाकणारी दृश्य सध्या पाहायला मिळत आहेत.
कराड तालुक्याचा इस्लामपूरशी संपर्क तुटला, कृष्णा नदीला पूर
कृष्णा नदीवरील बहे(ता.वाळवा) येथील पुलावरुन होणारी वाहतूक शुक्रवारी रात्रीपासून बंद करण्यात आली आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केल्यानंतर हा पुल जुना असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी सांगीतले. यामुळे वाळवा तालुक्यातील काही गावांचा व कराड तालुक्याचा इस्लामपूरशी संपर्क तुटला आहे. जोरदार पावसामुळे व कोयणा धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने सध्या कृष्णा नदीला पूर आला आहे. बहे येथील हा पुल जुना झाल्याने पुरामुळे पुलाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणुन हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे नरसिंहपूर , शिरटे, येडेमच्छिंद्र, कोळे, लवंडमाची या गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे.