(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आमचे लोक तुमच्याकडे येणार, हे सांगायला भाजप नेत्यांना भेटलो होतो; बाळासाहेब थोरातांचा विखे-पाटलांना टोला
राधाकृष्ण विखे पाटलांनी केलेल्या अशा वक्तव्यांना फार महत्व देण्याची गरज नाही. माझ्या मनातही काँग्रेस सोडण्याचा विचार आलेला नाही, बाळासाहेब थोरातांनी म्हटलं.
शिर्डी : विद्यमान मंत्री बाळासाहेब थोरात देखील भाजपात प्रवेश करणार होते, असा दावा राधाकृष्ण विखे पाटलांनी केला होता. त्यावर बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या नेत्यांना मी हे सांगायला भेटलो होतो की, आमचे चांगले लोक तुमच्याकडे पाठवतो आणि तस घडलंही, असा टोला बाळासाहेब थोरातांनी लगावला आहे.
राधाकृष्ण विखे पाटलांनी केलेल्या अशा वक्तव्यांना फार महत्व देण्याची गरज नाही. माझ्या मनातही काँग्रेस सोडण्याचा विचार आलेला नाही. काँग्रेसच्या विचाराने आजपर्यंत मी काम करत आलोय आणि यापुढेही करत राहणार आहे. सर्वांना काही स्वभाव माहिती असतात, त्यातून काही अंदाज बांधले जातात. आता सत्ता बदलली आहे, तर कोण कोण बदलेल हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळेच त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली असावी, असा टोलाही बाळासाहेब थोरातांनी विखे पाटलांना लगावला. मल्लिकार्जुन खर्गे यांना विखे पाटील भेटले की नाही मला माहित नाही, असंही त्यांनी सांगितलं.
काय म्हणाले होते राधाकृष्ण विखे पाटील?
बाळासाहेब थोरात देखील भाजपात प्रवेश करणार होते. बाळासाहेब थोरात कुणाकुणाला भेटले होते, याची सगळी माहिती माझ्याकडे असल्याचा दावाही विखे पाटलांनी यावेळी केला. बाळासाहेब थोरातांना सगळं अपघातानं मिळालं आहे. त्यात त्यांचं स्वत:चं कतृत्व काहीच नाही. अहमदनगर जिल्ह्यातील 12 पैकी तीन जागा त्यांनी लढवल्या. त्यात त्यांना कसंबसं यश मिळाल्याचे विखे म्हणाले. त्यामुळे थोरात यांनी माझ्या काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाची चिंता करु नये. कारण, दोन-तीन वर्षांपूर्वी थोरात भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्नात होते, असा गंभीर आरोप विखे-पाटील यांनी केला आहे.
काँग्रेसची भूमिका मी प्रभावीपणे राबवली होती. काही अडचणींमुळे काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व आम्ही मान्य केलं आहे, त्यामुळे काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही. आता मी भाजपचा कार्यकर्ता आहे. मात्र भाजप सोडण्याच्या ज्या चर्चा होत आहेत त्या दुर्दैवी आहेत. मी भाजपमध्येच राहणार आहे. माझी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट सुद्धा झालेली नाही, त्यामुळे अशा चर्चांमध्ये तथ्य नाही. माझी बदनामी करण्यासाठी अशा बातम्या येत आहेत. अशा चुकीच्या बातम्या पसरवण्याऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं होतं.