Work From Home नंतर ऑफिसमध्ये परतण्याऐवजी कर्मचारी नोकरी सोडत आहेत : सर्व्हे
सुरुवातीला नाईलाज म्हणून स्वीकारलेलं वर्क फ्रॉम होम कल्चर वर्षभरातनंतर कर्मचाऱ्यांनाही आवडू लागलं आहे. एका सर्वेक्षणानुसार लोक वर्क फ्रॉम होम असलेल्या नोकऱ्यांना प्राधान्य देत आहेत. ज्या कंपन्यांमध्ये ऑफिसमध्ये येणं बंधनकारक केलं जात आहे तिथले कर्मचारी नोकरी सोडण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत.
मुंबई : कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगभरात 'वर्क फ्रॉम होम' कल्चर मोठ्या प्रमाणात सुरु झालं. सुरुवातीला नाईलाज म्हणून अनेकांनी वर्क फ्रॉम होम स्वीकारलं होतं. पण वर्षभर वर्क फ्रॉम होम केल्यानंतर आता कर्मचाऱ्यांनाही ते आवडू लागलं आहे. आता जगभरातील पॅटर्ननुसार लोक वर्क फ्रॉम होम असलेल्या नोकऱ्यांना प्राधान्य देत आहेत. तर ज्या कंपन्यांमध्ये ऑफिसमध्ये येणं बंधनकारक केलं जात आहे तिथले कर्मचारी नोकरी सोडण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत.
एप्रिलमध्ये झालेल्या सर्व्हेचा आश्चर्यकारक निष्कर्ष
एप्रिल महिन्यात फ्लेक्स जॉब्स (FlexJobs) नावाच्या कंपनीने एक सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणात 2100 लोक सहभागी झाले होते. यामध्ये सामील लोकांनी सांगितलं की, "वर्क फ्रॉम होम कल्चर चांगलं आहे आणि ते यापुढेही सुरुच ठेवणं गरजेचं आहे. अशाप्रकारे काम केल्याने अनेक गोष्टींची बचत होते. केवळ जाण्या-येण्याचा खर्च कमी होतो असं नाही तर वेळचेही बचत होते. इतकंच नाही तर ऑफिसमधील राजकारणापासूनही स्वत:ला दूर ठेवण्यास यशस्वी ठरत आहोत.
70 टक्के कंपन्याही वर्क फ्रॉम होमसाठी सकारात्मक
ग्लोबल मार्केट रिसर्च फर्म फोरेस्टरनुसार (Forrester), "यूएस आणि युरोपमधील70 टक्के मल्टिनॅशनल कंपन्या या वर्क फ्रॉम होमचं कल्चर स्वीकारण्याच्या बाजूने आहेत. तर 30 टक्के कंपन्या पारंपरिक कार्यलयाच्या बाजूने आहेत." विशेष म्हणजे बहुतांश कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम हे कल्चर पूर्णत: स्वीकारलं आहे.
गूगल, फोर्डसह अनेक कंपन्या समर्थनात
गूगल, फोर्ड आणि सिटीग्रुप यांसारख्या मोठ्या कंपन्या वर्क फ्रॉम होम या हायब्रिड वर्क मॉडेलच्या समर्थनात आहेत. या कंपन्यांचे मोठे अधिकाऱ्यांनी अनेकदा सार्वजनिकरित्या वर्क फ्रॉम होम कल्चरचं कौतुक केलं आहे.
कर्मचाऱ्यांचं ऑफिसऐवजी राजीनाम्याला प्राधान्य
जगभरातून अशी माहितीही समोर येत आहे की, "ज्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये परत येण्यासाठी सांगितलं जात आहे, ते ऑफिसला न जाता राजीनामा देण्याला जास्त पसंती देत आहेत. हे कर्मचारी अशा नोकरीच्या शोधात आहेत, जिथे त्यांना ऑफिसमध्ये न जाता वर्क फ्रॉम होम करता येईल."